मुंबई : बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि मदन लाल यांची वर्णी लागणार आहे. ही समिती पुढच्या ४ वर्षांसाठी निवड समितीची घोषणा करेल. या समितीतल्या तिसऱ्या सदस्या मुंबईकर सुलक्षणा नाईक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुलक्षणा नाईक यांनी भारतासाठी २ टेस्ट आणि ४६ वनडे मॅच खेळल्या आहेत.
मदन लाल हे वयाने ज्येष्ठ असल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष असतील, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं आहे. बीसीसीआयकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे याबाबत बोलणं उचित होणार नाही, अशी प्रतिक्रिया मदन लाल यांनी दिली आहे.
मदन लाल यांनी भारतासाठी ३९ टेस्ट आणि ६७ वनडे मॅच खेळल्या. १९७४ ते १९८७ या काळात त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं. १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये मदन लाल यांनी ३ विकेट घेतल्या होत्या.
क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपद भुषवायला मदन लाल यांनी होकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही क्रिकेट सल्लागार समिती फक्त एकदाच बैठक घेणार आहे. कारण निवड समितीमध्ये २ सदस्यांचीच नियुक्ती करायची आहे.
सध्याचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (दक्षिण झोन), गगन खोडा (मध्य झोन) यांचा कार्यकाळ संपत आहे. या दोघांच्या बदली सदस्यांची निवड क्रिकेट सल्लागार समिती करेल. सरनदीप सिंग (उत्तर झोन), देवांग गांधी (पूर्व झोन) आणि जतीन परांजपे (पश्चिम झोन) यांचा ४ वर्षांपैकी १ वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. ज्युनियर क्रिकेट निवड समितीमध्येही बदल होणार आहेत.
याआधी क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली हे सदस्य होते. या तिघांनी अनिल कुंबळेंची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती. पण २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यावर कुंबळेंनी राजीनामा दिला. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर या तिघांनीच रवी शास्त्रींची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली.
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ २०१९ वर्ल्ड कपपर्यंत होता. यानंतर पुन्हा प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी बीसीसीआयने कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांची क्रिकेट सल्लागार समितीवर नेमणूक केली. या सल्लागार समितीनेही रवी शास्त्रींनाच पुन्हा प्रशिक्षक केलं.