टीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला

बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली. 

Updated: Jul 25, 2018, 05:20 PM IST
टीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला title=

मुंबई : बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली. या टीममध्ये निवड न झाल्यामुळे बंगालचा बॅट्समन मनोज तिवारी नाराज झाला आहे. मनोज तिवारीनं सोशल मीडियावर त्याचा राग व्यक्त केला. भारताच्या ए टीममध्ये माझी निवड होईल, असं मला वाटत होतं. जर कोणी चांगली कामगिरी करत असेल तर त्याची निवड व्हायला पाहिजे. भारतीय क्रिकेट इतिहासात कोणीच केलं नाही असं रेकॉर्ड मी केलं, असं मनोज तिवारी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला.

२०१७-१८ च्या मोसमात मनोज तिवारीनं १२६.७० च्या सरासरीनं ५०७ रन केल्या. भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं हे रेकॉर्ड आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्येही मनोज तिवारीची सरासरी १०० पेक्षा जास्त होती. आजपर्यंत कोणत्याच बॅट्समनला एका मोसमात अशी कामगिरी करता आलेली नाही.

तिवारीनं दिलं धोनीचं उदाहरण

निवड समितीकडून माझ्याशी कोणताही संवाद झालेला नाही, त्यामुळे माझं भविष्य अंधारात आहे. वय ही फक्त संख्या आहे. ३२ व्या वर्षी क्रिकेटपासून लांब करण्याचं कारण माझ्या लक्षात आलेलं नाही. आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीममधल्या खेळाडूंचं वय जास्त असल्याचं बोललं गेलं पण धोनीच्या टीमनं आयपीएल जिंकलं, असं वक्तव्य तिवारीनं केलं.

आता मी आणखी काय करू हे माझ्या लक्षात येत नाहीये. गौतम गंभीरनंतर मी सर्वात जास्तवेळा एफबीबी अवॉर्ड मिळालं आहे. मी टीममधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. त्यामुळे माझी निवड का झाली नाही हे मला निवड समितीकडूनच ऐकायचं आहे,असं वक्तव्य तिवारीनं केलं.

मनोज तिवारीनं भारताकडून १२ वनडे मॅच खेळल्या आहेत. तिवारीनं २६.०९ च्या सरासरीनं २८७ रन केले. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तिवरीनं २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईमध्ये १२६ बॉलमध्ये नाबाद १०४ रन केले. याचबरोबर तिवारीनं ३ टी-२० मॅचच्या एका इनिंगमध्ये १५.०० च्या सरासरीनं १५ रन केल्या आहेत.