स्मिथ-वॉर्नरच्या पुनरागमनावरून मायकल वॉन-मार्क वॉ भिडले

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत २-१नं पराभव झाला.

Updated: Jan 8, 2019, 08:01 PM IST
स्मिथ-वॉर्नरच्या पुनरागमनावरून मायकल वॉन-मार्क वॉ भिडले

मुंबई : भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत २-१नं पराभव झाला. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर टीममध्ये नव्हते म्हणून ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागल्याच्या प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियातून येत आहेत. आता याच मुद्द्यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ एकमेकांशी भिडले आहेत. स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुन्हा परतले तर सगळं ठीक होईल या भ्रमामध्ये ऑस्ट्रेलियानं राहू नये. स्मिथ आणि वॉर्नरच्या अनुपस्थितीपेक्षा ऑस्ट्रेलियाला इतर गंभीर मुद्द्यांनी ग्रासलं आहे. स्मिथ वॉर्नर परत आले तर या सगळ्या अडचणी संपतील असं ऑस्ट्रेलियाला वाटत असेल, तर ते चूक आहे, असं मायकल वॉननं एका वृत्तपत्राच्या स्तंभामध्ये लिहिलं आहे.

''भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची बॅटिंग, बॉलिंग, निवड आणि रणनिती सगळंच वाईट झालं. आता आपली टीम चांगली राहिली नसल्याचं ऑस्ट्रेलियानं मान्य करावं. तुमचे २ खेळाडू टीमबाहेर असतील तर कोणतीही टीम संघर्ष करेल. पण स्मिथ-वॉर्नरचं नसणं तुमच्यातलं कमी लपवण्याचं कारण असू शकत नाही. भारताचा इंग्लंडमध्ये ४-१नं पराभव झाला असला तरी या सगळ्या मॅच रोमांचक झाल्या आणि इंग्लंडचा कमी फरकानं विजय झाला. पण सिडनीमध्ये दोन दिवस पाऊस पडला नसता तर भारतानं ऑस्ट्रेलियाला ३-१नं हरवलं असतं'', असं मायकल वॉन म्हणाला.

''यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपनंतरच्या ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला इंग्लंडला हरवणं कठीण होईल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या बॅटिंगचं तंत्र सुधारावं लागेल आणि बॉलिंगमध्ये सातत्य आणावं लागेल. ऑस्ट्रेलियाच्या टीमला प्रत्येक विभागात सुधारण्याची गरज आहे'', असं मत मायकल वॉननं मांडलं.

mark waugh

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉनं मायकल वॉनला प्रत्युत्तर दिलं आहे. मला मायकल वॉनच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. त्याच्या या मताशी मी सहमत नाही. स्मिथ-वॉर्नरचं टीमचे सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि त्यांच्या पुनरागमनामुळे नक्कीच फरक पडेल. तुम्ही जगातल्या कोणत्याही टीमचे २ नाही तर १ खेळाडू बाहेर ठेवा आणि मग बघा काय होतं. जसं कोहली, रुट आणि विलियमसन, असं ट्विट मार्क वॉनं केलं.

Shane Warne 1

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननं मायकल वॉनच्या मताशी सहमती दर्शवली. या मुद्द्यावरून मी मायकल वॉनच्या मुद्द्याशी सहमत आहे. स्मिथ-वॉर्नरच्या पुनरागमनामुळे थोडा फरक पडेल, पण ऑस्ट्रेलियाला क्रिकेट सुधारण्यासाठी मोठी पावलं उचलावी लागतील. अंडर-२३ क्रिकेटमध्येही बदल करावे लागतील. उत्कृष्ट क्रिकेटपटू आम्हाला तयार का करता येत नाहीयेत? ते आम्हाला पाहावं लागेल, असं ट्विट शेन वॉर्ननं केलं.