नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय खेळाडूंनी काळी पट्टी बांधली. पण भारतीय खेळाडूंनी काळी पट्टी बांधल्यावरून वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी उपहासात्मक वक्तव्य केलं आहे.
सीरिजमध्ये ०-२नं पिछाडीवर असल्यामुळे भारतीय खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधलेल्या नाहीत, असं होल्डिंग म्हणाले. यानंतर होल्डिंग यांनी भारतीय टीमनं काळ्या पट्ट्या बांधल्याचं कारण सांगितलं. भारत आणि इंग्लंड टेस्ट मॅचमध्ये मायकल होल्डिंग कॉमेंट्री करत आहेत.
अटल बिहारी वाजपेयी आणि अजित वाडेकर यांचं निधन झाल्यामुळे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत, असं ट्विट बीसीसीआयनं केलं होतं.
The Indian Cricket Team is wearing black armbands as a mark of respect to former India captain Shri Ajit Wadekar and former India Prime Minister Shri Atal Bihari Vajpayee, who passed away recently. pic.twitter.com/vXMEFyODuy
— BCCI (@BCCI) August 18, 2018
अजित वाडेकर यांचं १५ ऑगस्टला निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात १९७१ साली भारतानं पहिल्यांदा परदेशामध्ये सीरिज जिंकली. १९७१ साली भारतानं इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये टेस्ट सीरिज जिंकली. तर अटल बिहारी वाजपेयी यांचं १६ ऑगस्टला दीर्घ आजारामुळे निधन झालं.
भारतीय टीमवर निशाणा साधण्याची मायकल होल्डिंग यांची पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी बीसीसीआय आणि भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. या टीकेचं प्रमुख कारण आयपीएल आहे. एवढच नाही तर वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये भाग घेतात यावरून त्यांनी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवरही टीका केली. तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयच्या भूमिकेवर मायकल होल्डिंग यांनी याआधीही आक्षेप घेतले होते. इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच सुरु व्हायच्या आधी हार्दिक पांड्याच्या कामगिरीवरही होल्डिंग यांनी टीका केली होती.