IPL 2020 : हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

हैदराबादचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Updated: Sep 23, 2020, 06:42 PM IST
IPL 2020 : हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) 10 धावांनी पराभव केला. या खराब सुरूवातीनंतर संघ त्याच्या पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करत होता, या दरम्यान संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापनाने सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा केली आहे. फ्रॅंचायझीने ट्विट केले आहे की, 'मिशेल मार्श संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ड्रीम 11 आयपीएल 2020 मध्ये त्याची जागा जेसन होल्डर घेईल.'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मिशेल मार्शला दुखापत झाली आणि त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. मिशेल मार्श स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने आता वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डरला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. आयपीएल 2020 मध्ये कोणत्याही संघाने त्याला लिलावात विकत घेतले नव्हते. त्याची बेसिक किंमत 75 लाख रुपये होती, तर मिशेल मार्शला सनरायझर्स हैदराबादने 2 कोटींमध्ये खरेदी केले होते.

जेसन होल्डर 3 वर्षानंतर आयपीएलमध्ये परतला आहे. यापूर्वी होल्डरने शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता. आयपीएलमधील त्याचे रेकॉर्ड काही खास नाही. त्याने 5 डावात 7.6 च्या सरासरीने फक्त 38 धावा केल्या आहेत. तर 5 विकेट्स घेतल्या आहेत, जेसन होल्डर एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जात असला तरी त्याचे आकडे इतके खास नाही. अलीकडेच जेसन होल्डरने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 10 सामन्यांत 10 विकेट घेतले होते.