नवी दिल्ली : विविध प्रकारच्या खेळांमध्ये अनेकांचीच रुची असते. अमुक एक खेळ म्हणजे आपलं सर्वस्व; असं सांगणारे अनेकजण आपल्याला भेटतात. लॉन टेनिस या खेळावर असंच नितांत प्रेम करणारं एक जोडपं सध्या साऱ्या जगाचं लक्ष वेधत आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल़्डन या स्पर्धेच्या आयोजकांकडूनही या जोडीची दखल घेण्यात आली आहे.
क्रीडा विश्वात सध्या चर्चा सुरु आहे, ती म्हणजे क्रिकेट विश्वचषकाची आणि विम्बल्डन स्पर्धेची. सोमवारपासून सुरु झालेल्या विम्बल्डन स्पर्धेनंतर क्रीडा विश्वात हे सारं वातावण चांगलच रंगताना दिसत आहे. यादरम्यानच फेसबुकच्या माध्यमातून हैदराबादच्या व्यंकटेशन आणि त्यांच्या पत्नी गौरी व्यंकटेशन यांचा अनोखा प्रवास सर्वांपर्यंत आणला आहे. मुख्य म्हणजे या जोडीचा उत्साह पाहता, वयाचा आकडा कधीच आपल्या आवडीच्या गोष्टींच्या आड येत नसतो हेच स्पष्ट होत आहे.
टेनिस विश्वात अग्रगणी असणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेच्या सेंटर कोर्टवर एकदा तरी टेनिसचा सामना पाहण्याचं त्यांचं स्वप्न होतं. जे अखेर पूर्णत्वास गेलं आहे. या क्षणाचा आनंद व्यंकटेशन दाम्पत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत आहे. आपल्या मुलाने या खेळात किंबहुना विम्बल्डनमध्ये खेळावं अशी त्या दोघांचीही इच्छा होती. पण, काही कारणास्तव गोष्टी शक्य झाल्या नाहीत.
मुलगा टेनिस खेळताना आणि शिकताना गौरा व्यंकटेशन यांची या खेळाप्रती असणारी अभिरुची वाढली. पाहता पाहता त्यांनीही या खेळाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणत त्या शिकण्यावर भर दिला. आजच्या क्षणाला याचीदेही याची डोळा विम्बल्डन सामना अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली. हे आपलं भाग्यच असल्याचं म्हणत या हे श्रण अद्वितीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. अवघ्या काही शब्दांमध्येच हा आनंद व्यक्त करणं अशक्य असल्याचंही त्यांनी म्हटलं.