Team India Coach: धोनीसुद्धा शर्यतीत? कोहलीचा निकटवर्तीय म्हणाला, 'सर्वजण धोनीला..'

MS Dhoni Team India Coach: धोनीने भारताला 2 वर्ल्ड कप जिंकवून दिले आहेत. तसेच धोनीचं यंदाचं आयपीएलचं पर्व हे त्याचं शेवटचं पर्व असेल अशी जोरदार चर्चा आयपीएल सुरु असताना होती. त्यामुळेच धोनीचा प्रशिक्षकपदासाठी विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 28, 2024, 01:01 PM IST
Team India Coach: धोनीसुद्धा शर्यतीत? कोहलीचा निकटवर्तीय म्हणाला, 'सर्वजण धोनीला..' title=
धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही (फाइल फोटो)

MS Dhoni Team India Coach: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे. सोमवारी म्हणजेच 27 मे पर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मागवले होते. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशीची डेडलाइन यासाठी देण्यात आली होती. या पदासाठी कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे बीसीसीआयने स्वत: विचारणा केली नसल्याचं बीसीसीआयचे सचिव अमित शाह यांनी पूर्वीच स्पष्ट केलं आहे. जय शाह यांनी केलेल्या विधानांकडे पाहिल्यास बीसीसीआय भारतीय प्रशिक्षकाच्याच शोधात असल्याचं स्पष्ट होत आहे. अशावेळी आयपीएलचं जेतेपद कोलकाता नाईट रायडर्सला जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरचं पारडं अधिक जड वाटत असून तो सुद्धा ही नवी जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं समजतं. मात्र भारतीय प्रशिक्षक पदासाठी आता थेट भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीचं नाव समोर येत आहे.

धोनी प्रशिक्षक का हवा?

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या एका निकटवर्तीयाने धोनीचं नाव प्रशिक्षक पदासाठी सुचवलं आहे. कोलहीचे प्रशिक्षक असलेल्या राजकुमार शर्मा यांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक करता येईल असं म्हटलं आहे. प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या राजकुमार शर्मा यांनी आपली भूमिका मांडताना, "या पदासाठी कोणी कोणी अर्ज केला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला स्वत:ला असं फार वाटतं की जो कोणी भारतचा प्रशिक्षक होईल तो भारतीय असावा. महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती घोषित केली तर तो या पदासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. तो (धोनी) फार क्रिकेट खेळला आहे. त्याने अनेक स्पर्धा संघाला जिंकून दिल्या असून त्याचा अनुभव फायद्याचा ठरु शकतो," असं 'न्यूज इंडिया'च्या 'क्रिकेट प्रेडिक्टा' नावाच्या कार्यक्रमात म्हटलं आहे.

धोनी जेव्हा कर्णधार झाला तेव्हा..

"ड्रेसिंग रुममध्ये सर्वजण धोनीला फार आदर देतील. धोनी फार दिर्घकाळ क्रिकेट खेळला आहे. संघासाठी योग्य नियोजन करणं आणि संघाचं उत्तम व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. धोनी जेव्हा कर्णधार झाला होता तेव्हा संघात अनेक मोठे खेळाडू होते. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, विरेंद्र सहेवाग, राहुल द्रविड, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, गौतम गंभीर, युवराज सिंगसारख्या खेळाडूंचा समावेश होता. असं असतानाही धोनीने उत्तम पद्धतीने संघ हाताळला," असंही राजकुमार शर्मांनी म्हटलं आहे. आता खरोखरच धोनीचा विचार भविष्यात भारतीय प्रशिक्षक म्हणून होतो का हे येणारा काळच सांगेल. धोनीने कर्णधार म्हणून भारताला 2007 साली पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तर 2011 मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला होता.

नक्की वाचा >> शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला, 'तूच सगळा..'

धोनी एका दौऱ्यात होता मेंटॉर

धोनीने यापूर्वी 2021 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं मेंटॉर म्हणून काम पाहिलं होतं. ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. 

धोनीच्या निवृत्तीसंदर्भात संभ्रम

धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. 2024 चं आयपीएलचं पर्व धोनीचं शेवटचं पर्व असेल असं म्हटलं जात होतं. मात्र चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफ आधीच बाहेर पडला. धोनीने निवृत्तीसंदर्भात कोणतीही भाष्य केलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वानाथ यांनी थेट धोनी पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये संघासोबत दिसेल असं म्हटलं आहे.