'म्हणून धोनीची निवड केली नाही'; एमएसके प्रसाद यांचं स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट टीम ही सध्या न्यूझीलंडमध्ये आहे.

Updated: Feb 6, 2020, 08:55 PM IST
'म्हणून धोनीची निवड केली नाही'; एमएसके प्रसाद यांचं स्पष्टीकरण title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम ही सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी टीम इंडियाची शेवटची निवड केली आहे. यानंतर पुढच्या सीरिजसाठी नव्या निवड समिती अध्यक्षाची घोषणा होणार आहे. मागच्या ४ वर्षांपासून एमएसके प्रसाद निवड समिती अध्यक्ष होते. गेल्या काही काळापासून एमएस धोनीची निवड न होण्याचं कारण एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.

मीदेखील इतर भारतीयांप्रमाणे एमएस धोनीचा चाहता आहे, पण माझ्यावरच्या जबाबदाऱ्यांमुळे धोनीला टीममध्ये जागा देता आली नाही. टीम इंडियाचं भविष्य बघण्यासाठी आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायची होती. आम्ही तरुण खेळाडूंचं समर्थन करतो आणि त्यांना जास्त काळ खेळण्याची मुभा देतो, असं एमएसके प्रसाद स्पोर्ट्सस्टारशी बोलताना म्हणाले.

एमएस धोनी त्याच्या भवितव्याचा निर्णय स्वत: घेईल. निवड समिती म्हणून पुढचा विचार करणं आणि पुढच्या पिढीला तयार करणं, तसंच त्यांना संधी देणं, हे आमचं कर्तव्य होतं. धोनीने कारकिर्दीमध्ये सगळं मिळवलं आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने २ वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तसंच भारत टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला. यावर कोणीही प्रश्न उपस्थित करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया एमएसके प्रसाद यांनी दिली.

रोहित शर्मा आता सगळ्या फॉरमॅटचा खेळाडू झाला आहे. रोहितमध्ये झालेला बदल हा सुखद आहे. वनडेमध्ये द्विशतकं करणाऱ्या रोहितचं कौशल्य आम्हाला माहिती होतं. मागच्या ४-५ महिन्यांमध्ये रोहितने टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून आपला दर्जा दाखवला आहे. परदेशातही त्याने चांगली कामगिरी करावी, अशी माझी अपेक्षा आहे, असं एमएसके प्रसाद यांना वाटतं.