क्रिकेटसाठी घर सोडलं, एक वर्ष बिस्किट खाऊन पोट भरलं... मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची संघर्षमय कहाणी

तब्बल 9 वर्षांनी भेटला आपल्या कुटुंबाला, सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

Updated: Aug 3, 2022, 09:38 PM IST
क्रिकेटसाठी घर सोडलं, एक वर्ष बिस्किट खाऊन पोट भरलं... मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची संघर्षमय कहाणी title=

Kumar Karthikeya: इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलने आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना नवं व्यासपीठ दिलंय. आयपीएलमधून भारतीय क्रिकेट संघाला अनेक खेळाडू दिले आहेत. गरीब घरातील खेळाडूंना आयपीएलमुळे स्वत:ची ओळख मिळाली आहे.

आयपीएलमधल्या अशाच एका खेळाडूचं संघर्षमय कहाणी समोर आली आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी या खेळाडूने चक्क घर सोडलं आणि तब्बल 9 वर्षांनी तो आपल्या कुटुंबाला भेटला. या खेळाडूचं नाव आह कुमार कार्तिकेय.

कुमार कार्तिकेयने सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपण तब्बल 9 वर्ष आणि 3 महिन्यांनी कुटुंबाला भेटत असल्याचं सांगितलं आहे. सोबत त्याने एक फोटोही शेअर केला आहे. 

या फोटोमध्ये कार्तिकेय त्याच्या आईसोबत दिसत आहे. या पोस्टसह, कार्तिकेयने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, माझं कुटुंब आणि आई 9 वर्ष आणि 3 महिन्यांनंतर भेटत आहे. मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही.

कार्तिकेयचा जन्म उत्तर प्रदेशातील सुलतानपूर इथं झाला. त्याचे वडील श्यामनाथ सिंह हे झाशी इथं हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. कार्तिकेयला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला घरातून पाठिंबा मिळाला नाही. शेवटी क्रिकेट शिकण्यासाठी त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

कार्तिकेयने घर सोडल्यानंतर थेट दिल्ली गाठली. इथे तो एका क्रिकेट अकादमीत दाखल झाला. क्रिकेट अकादमीची फी भरण्यासाठी त्याने गाझियाबाद इथल्या एक कारखान्यात काम सुरु केलं. तो रोज 70 ते 80 किलोमीटर प्रवास करत होता. भूक लागली की बिस्किटं खायचा. जवळपास वर्षभर तो दुपारचं जेवला नव्हता.

कुमार कार्तिकेयचा हा संघर्ष गौतम गंभीरचे कोच संजय भारद्वाज यांच्या कानावर आला. त्यांनी कार्तिकेयला बोलावून घेतलं आणि सर्वात आधी त्याच्या जेवणाची व्यवस्था केली. यावेळी कुमार कार्तिकेयच्या डोळ्यात अश्रू तरळले.

कार्तिकेयच्या संघर्षाला अखेर यश आलं. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात त्याला स्थान मिळालं. 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये कार्तिकेय संघात सामीला झाला. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अरशद खान दुखापतग्रस्त झाल्याने कार्तिकेयला संघात खेळण्याची संधी मिळाली. कार्तिकेयने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत.