ऐतिहासिक ५००व्या रणजीमध्ये या खेळाडूनं मुंबईची लाज राखली

मुंबईनं रणजीमध्ये ऐतिहासिक ५००वा सामना खेळला. 

Updated: Nov 12, 2017, 09:21 PM IST
ऐतिहासिक ५००व्या रणजीमध्ये या खेळाडूनं मुंबईची लाज राखली  title=

मुंबई : मुंबईनं रणजीमध्ये ऐतिहासिक ५००वा सामना खेळला. बडोद्याविरुद्धच्या या सामन्यामध्ये मुंबईवर पराभवाची नामुष्की ओढावली असती. पण सिद्धेश लाडनं ४ तास किल्ला लढून मॅच ड्रॉ करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. सिद्धेशनं केलेल्या नाबाद ७१ रन्समुळे मुंबईला एक पॉईंट मिळवायला मदत झाली.

मुंबईसाठी ही ५००वी ऐतिहासिक मॅच पहिल्यापासूनच फारशी अनुकूल राहिली नव्हती. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईचा डाव १७१ रन्सवर संपुष्टात आला. त्यानंतर बडोद्यानं त्यांची इनिंग ५७५/९वर घोषीत केली. यामुळे बडोद्याला तब्बल ४०४ रन्सची आघाडी मिळाली. मुंबईपुढे इनिंगनं पराभव टाळण्याचं आव्हान होतं.

मॅचच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी मुंबईच्या दुसऱ्या इनिंगच्या चार विकेट १०२ रन्सवर गेल्या होत्या. पण अजिंक्य रहाणे(४५) वर आऊट झाला. यानंतर सिद्धेश लाडनं क्रिजवर टिकून राहून बडोद्याच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवलं.

सिद्धेश लाडनं सूर्यकुमार यादव (४४)बरोबर सहाव्या विकेटसाठी ७९ रन्सची पार्टनरशीप केली. दीपक हुड्डानं यादवला आऊट करून ही पार्टनरशीप तोडली. मग लाडनं अभिषेक नायरबरोबर पार्टनरशीप करून मुंबईचा पराभव वाचवला. लाडनं इनिंगमध्ये २३८ बॉल्स खेळून नाबाद ७१ रन्स बनवल्या, यामध्ये ७ फोरचा समावेश होता. तर नायरनं १०८ बॉल्समध्ये ८ रन्स बनवले.

बडोद्याचा ऑफ स्पिनर कार्तिक काकडेनं नायरला आऊट करून पुन्हा एकदा बडोद्याच्या जिंकण्याच्या आशा पल्लवीत केल्या पण धवल कुलकर्णीनं ३१ बॉल्समध्ये नाबाद २ रन्सकरून मॅच ड्रॉ केली. मुंबईनं दुसऱ्या इनिंगमध्ये २६०/७ एवढा स्कोअर केला.

या रणजी सिझनमध्ये मुंबईची ग्रुप सीमध्ये ही तिसरी मॅच ड्रॉ झाली आहे. मुंबई ११ अंकांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बडोद्याचे चार मॅचमध्ये ७ पॉईंट्स आहेत.