नवी दिल्ली : इंडियन प्रिमिअर लीग सामन्यांवेळी रोज लाखों लीटर पाण्याची नासाडी होत असल्याने या स्पर्धेवर प्रतिबंध लावण्याच्या याचिकेवर राष्ट्रीय हरित प्राधिकरणने केंद्र, बीसीसीआय आणि आणखी काहींना उत्तर मागितलं आहे.
जस्टिस जावेद रहीम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जल संसाधन मंत्रालय, भारतीय क्रिकेट बोर्ड आणि जिथे सामने होणार आहेत त्या नऊ राज्यांना नोटीस पाठवल्या आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे.
अलवर येथील तरूण हैदर अली याने आयपीएल दरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करणा-यांविरोधात कारवाईची मागणी करत याचिका केली आहे. यात म्हटलं गेलं आहे की, ‘संबंधीत अधिका-यांना व्यावसायिक उद्देशाने होत असलेल्या या स्पर्धेचं आयोजन थांबवलं जावं’.
याआधी २०१६ मध्ये आयपीएल सुरू होण्याआधीही पाण्याच्या नासाडीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी बीसीसीआय आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सहयोगींनी मुंबई हायकोर्टाने दणका दिला होता. कोर्ट म्हणाले होते की, आयपीएलचे सामने अभूतपूर्व दुष्काळ पाहता राज्यातून बाहेर केले पाहिजे. न्यायाधीश वी.एम.कानडे आणि न्यायमूर्ती एम.एस.कार्णिक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले होते.