Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!

Nisha Dahiya at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधील 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या सामन्यात भारताची कुस्तीपटू निशा दहियाने नेत्रदिपक कामगिरी केली. मात्र, 12 सेकंदात तिचं पदक हुकलं.

सौरभ तळेकर | Updated: Aug 5, 2024, 11:50 PM IST
Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली! title=
Nisha Dahiya at Paris Olympics fight Wrestling

Paris Olympic 2024 : सामन्याचे अखेरचे 12 सेकंद... सामना भारताच्या बाजूने होता. उत्तर कोरियाची कुस्तीपटू सोल गम पाक राग डोक्यात ठेऊन संधीची फक्त वाट बघत होती. भारताची कुस्तीपटू निशा दहिया इकडे वेदनेने कळवळत होती. निशा दहियाचा खांदा डिस्लोकेट झाला अन् तिचं बोट देखील तुटलं होतं. सामना थांबवावा लागला. निशा तळमळत होती. ती सामना खेळणार की नाही? अशी चिंता सर्वांना लागून राहिली. पण निशाने धीर सोडला नाही. पुन्हा रिंगमध्ये मोडलेल्या खांद्यासह उभी राहिली अन् वाघासारखी लढली सुद्धा..!

उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने कोणतीही दया माया न दाखवला निशाच्या खांद्यावर प्रहार केला अन् दोन पॉईट्स घेतले. निशाने रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तिला एका हाताने लढणं जमलं नाही. अखेर 30 सेकंदापूर्वी 8-1 असलेला सामना पुढच्या 30 सेकंदात 10-8 असा झाला अन् उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने रडीचा डाव खेळत सामना जिंकला.

नेमकं काय झालं?

कुस्तीपटू निशा दहियाने महिलांच्या कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शानदार सुरुवात केली होती. तिने पहिल्या हाफमध्ये उत्तर कोरियाच्या पाक सोल गमविरुद्ध 4-0 अशी आघाडी घेतली होती. निशाची लीड पाहून उत्तर कोरियाच्या खेळाडूने अटॅक करणं सुरू केलं. दुसऱ्या हाफच्या पहिल्या 5 सेकंदातच सोल गमने 1 पॉईंट घेतला. त्यानंतर निशाने तिला जोरदार प्रत्युत्तर देत 2 पाईंट्स घेतले. त्यावेळी पुढचा डाव खेळताना उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने रडीचा डाव खेळला अन् निशाचं बोट मोडलं. सामन्याला फक्त 1 मिनिट शिल्लक होता. पारडं भारताचं जड होतं. निशा 8.. तर सोल गम 1... त्यानंतर निशा पुन्हा मैदानात उतरली अन् सामन्याला जोर लावला.

निशाला काहीही करून कमजोर करण्याचा डाव उत्तर कोरियाच्या पैलवानाने आखला. त्यामुळे तिने निशाचा खांदा डिस्लोकेट केला. निशा मैदानातच वेदनेने तळमळत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मोठी आघाडी असताना देखील निशासमोर पर्याय नव्हता. सामन्याला 33 सेकंद बाकी होती. निशाचा खांदा साथ देत नव्हता. विरोधी सोल गमने याचाच फायदा घेतला अन् 2+2+2 असे 6 गुण घेतले. सामना आता 8-8 ने बरोबरीवर आला. 12 सेकंद बाकी असताना निशाला वेदना झाल्याने सामना पुन्हा थांबला. 12 सेकंदात सोल गमला 2 पाईंट्सची गरज होती.

भारताने अपेक्षा सोडल्या... दुखापत झाली नसती तर भारताचं मेडल फिक्स होतं. पण दुखापतीने घात केला. कोणालाही अपेक्षा नसताना निशा पुन्हा उभी राहिली अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. खांदा निसटला, बोट मोडलं तरीही निशा उभी राहिली, यातच गोल्ड मेडल मिळाल्याची भावना सर्वांच्या मनात तयार झाली. पुढच्या 12 सेकंदात उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने 2 पाईंट्स घेतले अन् सामना जिंकला. निशाने भलेही सामना गमवाला असेल पण निशा खऱ्या अर्थाने वाघासारखी लढली..!