मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. जगातल्या सगळ्याच महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा आर्थिक फटका आता वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनाही बसायला सुरूवात झाली आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची जानेवारीपासूनची मॅच फी रखडली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या रिपोर्टनुसार वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आयर्लंडविरुद्धची सीरिज आणि त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सीरिजची मॅच फी मिळालेलं नाही. तर दुसरीकडे महिला टीमला टी-२० वर्ल्ड कपच्या ४ मॅचचं मानधनही मिळालेलं नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये टी-२० वर्ल्ड कप झाला होता.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटातून जात आहे. करारबद्ध झालेल्या खेळाडूंना त्यांचे पगार आणि भत्ता मिळालेला आहे. काही खेळाडूंना बक्षिसाची आणि मॅचची रक्कमही देण्यात आली आहे. खेळाडूंना काही रक्कम द्यायची बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर द्यायचा आमचा प्रयत्न आहे. खेळाडूंना मॅच फी देण्याच्या बाबतीत आम्ही २ महिने पिछाडीवर आहोत, असं क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांनी सांगितलं.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना भत्ता आणि मानधन मिळत आहे, पण त्यांची मॅच फी रखडली आहे, असं वेस्ट इंडिज खेळाडू संघटनेचे सचिव वेन लुईस यांनी सांगितलं. करारबद्ध खेळाडूंना मानधन आणि भत्ते मिळत असले तरी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना मागचे ८ राऊंड खेळल्यानंतरही मॅच फी मिळालेली नाही.