Wimbledon 2021 - नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम

अंतिम सामन्यात जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीचा केला चार सेटमध्ये पराभव

Updated: Jul 11, 2021, 10:12 PM IST
Wimbledon 2021 - नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम

Wimbledon 2021 : सर्बियाचा जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविचने विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीचा पराभव केला. 

चार सेटमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात बेरेटिनीने पहिला सेट सेट 7-6 असा जिंकत दणक्यात सुरुवात केली. पण अनुभवी जोकोविचने पुढचे सलग दोन सेट जिंकत आघाडी घेतली. दुसरा सेट 6-4 तर तिसरा सेटही 6-4 असा जिंकत जोकोविचने बेरेटिनीवर दबाव वाढवला. या दबावातून बेरेटिनीला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. जोकोविचने आपला पूर्ण अनुभव पणाला लावत चौथा सेटही 6-3 असा खिशात घातला आणि विम्बल्डनचं जेतेपद आपल्या नावावर केलं.   

विम्बल्डन जिंकत नोव्हाक जोकोव्हिचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदालची बरोबरी केली आहेत. फेडरर आणि नदाल यांनी प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोव्हिचने आता या विक्रमाची बरोबरी केली असून यामध्ये  6 विम्बल्डन विजेतेपदांचा समावेश आहे.  यंदा नदाल विम्बल्डनमध्ये खेळला नाही. तर, उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर फेडरर स्पर्धेबाहेर पडला.