'या' दिवशी ठरणार भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचं भवितव्य, ICC मोठा निर्णय घेणार?

आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेपैकी एक असलेल्या या टी 20 वर्ल्ड कपवरही कोरोनाची टांगती तलवार आहे.

Updated: May 21, 2021, 04:38 PM IST
'या' दिवशी ठरणार भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचं भवितव्य, ICC मोठा निर्णय घेणार?  title=

मुंबई : टी  20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup) चे यजमानपद भारताला मिळाले आहे. मात्र आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेपैकी एक असलेल्या या टी 20 वर्ल्ड कपवरही कोरोनाची टांगती तलवार आहे. कोरोनामुळे भारताला या स्पर्धेचं यजमानपद गमवावं लागू शकतं. तसेच ही स्पर्धा स्थगित किंवा रद्दही करावी लागू शकते. याबाबत अजूनही काहीही निश्चित नाही. या पार्श्वभूमीवर आयसीसी येत्या 1 जूनला एक मह्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. या बैठकीत या स्पर्धेचं भवितव्य ठरणार आहे. (on 1st June 2021 icc will take final decision about t20 world cup held in india) 

बैठकीत कशावर चर्चा होणार?     

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन भारताऐवजी दुसरं कुठे करता येईल, याचं वेळापत्रक काय असेल, भारतात आयोजन झाल्यास किती आणि कोणत्या शहरात सामन्यांचे आयोजन केलं जाणार या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत निर्णय घेतले जाऊ शकतात. या बैठकीत आयसीसी आणि संबंधित अधिकारी उपस्थित असणार आहेत.

आयसीसीच्या स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे कोणत्याही देशासाठी अभिमानाची बाब असते. मात्र भारतात कोरोनाचे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. तसेच अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.

सर्व खबरदारी घेतल्यानंतरही आयपीएलचं 14 वा मोसम स्थगित करावा लागला. बायो-बबलमध्ये कोरोना शिरला. अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. अखेर बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला. त्यामुळे आयसीसी या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतीत जपूण निर्णय घेत आहे.