मुंबई : भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये २००-३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. यामध्ये अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर यांचा समावेश असल्याचे समजते. एवढच नाही तर या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाला आहे.
भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एअर स्ट्राईक केला. यावेळी मिराज विमानांकडून तब्बल १००० किलो स्फोटके जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर डागण्यात आली. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर असणाऱ्या २०० एके रायफल, अगणित काडतुसे, ग्रेनेड, स्फोटके आणि डिटोनेटर हा सर्व शस्त्रसाठा उद्ध्वस्त झाला.
आमच्या चांगुलपणाला आमचा कमकुवतपणा समजू नका, असा इशारा सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानला दिला आहे. तसंच ही कारवाई करणाऱ्या भारताच्या वायुदलाला सचिननं सलाम केला आहे. याबद्दलचं ट्विट सचिननं केलं आहे.
Our niceness should never be comprehended as our weakness.
I salute the IAF, Jai Hind— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 26, 2019
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे. यामुळे आगामी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे. सौरव गांगुली, हरभजन सिंग यांच्यासारख्या माजी क्रिकेटपटूंना या मागणीला पाठिंबा दिला. तर सचिननं मात्र वेगळीच भूमिका मांडली. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळून त्यांना फुकटचे २ गुण का द्यायचे? त्यापेक्षा ही मॅच जिंकून त्यांना वर्ल्ड कप बाहेर करण्याचा प्रयत्न करा, असं सचिन म्हणाला होता.