Cricket : राष्ट्रीय संघातून खेळण्याचं आणि त्यातच कर्णधार होण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण कर्णधारपद मिळवल तितकं सोप नसतं. त्यामागे कठोर मेहनत आणि जिद्द लागते. पण त्याचबरोबर टीका आणि वादालाही सामोरं जावं लागतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). आयपीएलच्या सतराव्या हंगामाआधी (IPL 2024) मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने पाचवेळा विजेत्या रोहित शर्माची (Rohit Sharma) उचलबांगडी करुन हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केलं. यावरुन अद्यापही वाद सुरु आहे. यामुळे मुंबईच्या संघात रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या असे दोन गट पडल्याचीही चर्चा आहे
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद
हा वाद ताजा असतनाच आता पाकिस्तान क्रिकेटमध्येही कर्णधारपदावरुन उभी फूट पडली आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझम (Babar Azam) आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदीमध्ये (Shaheen Afridi) सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. एका आठवड्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरुन शाहिन आफ्रीदीची हकालपट्टी करत पुन्हा बाबर आझमकडे नेतृत्व सोपवलं. यावर शाहीनने केलेल्या एका पोस्टने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
शाहिन-बाबरमध्ये उभी फूट
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी पीसीबीने शाहिन आफ्रिदीऐवजी पाकिस्तान क्रिकेट संघाची (PCB) धुरा बाबर आझमकडे सोपवली आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पीसीबीने शाहिन आफ्रिदीला कोणतीही कल्पना न देताच निर्णय घेतला. त्यामुळे शाहिन प्रचंड नाराज आहे. यानंतर शाहिन आफ्रिदीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक शेर म्हटला आहे. यात त्याने म्हटंलय. 'मला अशा परिस्थितीत आणू नका, जिथे मला दाखवावं लागेल की मी किती क्रूर आणि निर्दयी आहे'
शाहिन आफ्रिदी नाराज
2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी अतिशय खराब झाली होती. यानंतर पीसीबीने बाबर आझमला कर्णधारपदावरुन दूर केलं. त्यानंतर कसोटी आणि टी20 संघासाठी दोन वेगळे कर्णधार नियुक्त करण्यात आले. कसोटी संघाची जबाबादारी शान मसूद कडे तर टी20 संघाची जबाबादारी शाहिन आफ्रिदीकडे सोपवण्यात आली. न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेतून शाहिनने आपल्या कर्णधारपदाची सुरुवात केली. पण हा दौरा पाकिस्तानसाठी निराशाजनक ठरला. पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला 1-4 ने लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. यानंतर अवघ्या चार महिन्यातच शाहिनची हकालपट्टी करण्यात आली.
आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि टी20 वर्ल्ड कप पूर्वी पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची कमान बाबर आझमकडे सोपवण्यात आलीय. पीसीबीच्या या निर्णयावर शाहीनने सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं बोललं जात आहे. शाहिनने इन्स्टा पोस्टवर पुढे म्हटलंय, 'माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका. कारण एकदा मी मर्यादा ओलांडली की मी असे काही करेन ज्याचा कोणी विचारही केला नसेल.'
पीसीबीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
बाबर आझमला पुन्हा कर्णधार बनवल्याने पाकिस्तान क्रिकेट फॅन्स हैराण आहेत. पीसीबीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर पीसीबीने हा रणनितीचा एक भाग असल्याचं उत्तर दिलं आहे. खेळाडूंच्या भल्यासाठी आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात असं पीसीबीने सांगितलंय. टी20 वर्ल्ड कप पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोणताही धोका स्विकारु इच्छित नसल्याचंही बोललं जात आहे.