IND vs NZ : व्हाईट वॉशनंतरही 'या' पाकिस्तानी खेळाडूकडून विराटचं समर्थन

कारकिर्दीतील कठीण प्रसंगाविषयी भाष्य करतेवेळी...

Updated: Mar 3, 2020, 07:48 PM IST
IND vs NZ : व्हाईट वॉशनंतरही 'या' पाकिस्तानी खेळाडूकडून विराटचं समर्थन  title=
विराट कोहली

मुंबई :  NZ  न्यूझीलंडविरोधात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्येही भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय संघाने ही मालिका गमावल्यानंतर  सर्वच स्तरांतून संघाच्या कामगिरीवर आणि विशेष म्हणजे कर्णधारपदी असणाऱ्या Virat Kohli विराट कोहलीवर निशाणा साधण्यात आला. यामध्येच आता विराटचं समर्थन करण्यासाठी थेट पाकिस्तानी क्रिकेटपटूनं पुढाकार घेतला आहे. 

विराटच्या क्रिकेट खेळण्याच्या तंत्राचं समर्थन करणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणजे संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल हक. विराटने त्याच्या खेळाच्या तंत्रात कोणताही बदल करु नये, असंच इंजमाम उल हक म्हणाला. 

कोहलीने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये २, १९, ३, आणि १४ अशा धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याची सरासरी होती ९.५०. विराटच्या खेळाचं एकंदर प्रदर्शन पाहता इंजमाम म्हणाला, 'अनेकजण विराटच्या खेळण्याच्या तंत्राविषयी बरंच काही बोलत आहेत. मला हे पाहून धक्काच बसला आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतकं झळकावली आहेत. असं असताना तुम्ही त्याच्या खेळण्याच्या तंत्रावर कसा प्रश्न उपस्थित करु शकता?', असं इंजमाम त्याच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये म्हणाला. 

विराटच्या कारकिर्दीतील कठीण प्रसंगाविषयी भाष्य करतेवेळी त्याने मोहम्मद युसूफचं उदाहरण दिलं. तो ज्यावेळी चांगल्या खेळाचं प्रदर्शन करु शकत नव्हता, त्यावेळी त्याच्या खेळण्याच्या तंत्रावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं. त्यावर युसूफला इंजमामचा एकच प्रश्न होता, तू याच (इतरांच्या म्हणण्यानुसार वाईट खेळण्याच्या) तंत्रामध्ये इतक्या धावा कशा केल्या?

पराभवामध्ये संघाची कामगिरी चांगली नसल्याचा मुद्दा त्याने अधोरेखित केला. जर विराट अपयशी ठरत आहे, तर मग बाकीच्या खेळाडूंचं काय? असा सवाल करत हा खेळाचा एक भाग असून तोसुद्धा स्वीकारला पाहिजे असं ठाम मत त्याने मांडलं. शिवाय येत्या काळात विराट तितक्याच ताकदीने दमदार पुनरागमन करेल अशी आशाही त्याने व्यक्त केली. विराटने त्याच्या खेळण्याच्या तंत्रात कोणताही बदल करु नये. कारण तो एक तगडा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या तंत्राविषयी काही बोलायलाच नको असा विश्वास त्याने व्यक्त केला.