भारताच्या आक्षेपामुळे पाकिस्तान एशिया कपचं यजमानपद सोडण्याची शक्यता

 पाकिस्तान एशिया कपचं यजमानपद सोडणार?

Updated: Feb 20, 2020, 03:05 PM IST
भारताच्या आक्षेपामुळे पाकिस्तान एशिया कपचं यजमानपद सोडण्याची शक्यता title=

मुंबई : पाकिस्ताननं एशिया कपचं यजमानपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या एशियाकपचं यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आलं आहे. भारताच्या आक्षेपानंतर हा वाद सुरु होता. 'आशियाई क्रिकेट परिषदेशी संलग्न असलेल्या इतर संघांचाही आम्हाला विचार करायचा आहे. त्यामुळे सर्वांचा विचार घेतल्यानंतर यजमानपदाबाबत निर्णय घेणार,' असल्याचं वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी केलं आहे.   

भारतीय टीम २००८ नंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेली नाही. २००७ नंतर दोघांमध्ये कोणतीही मालिका देखील झालेली नाही. भारताने पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेतला होता. पाकिस्तानची टीम  २०१२ मध्ये वनडे सीरीज खेळण्यासाठी आली होती. 

पीसीबी चीफ एक्जक्यूटिव ऑफिसर वसीम खान यांनी असे संकेत दिले आहे की, 'जर पाकिस्तान आपल्या देशात या सीरीजचं आयोजन नाही करु शकत तर ते यजमानपद सोडायला तयार आहेत. एका अशा जागेचा विचार व्हावा जी सगळ्यांना मान्य असेल.'

२०१८ चा एशिया कप यूएई मध्ये खेळला गेला होता. कारण भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की, ते पाकिस्तानच्या टीमला होस्ट करणार नाहीत.