न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेत तैनात पाकिस्तानी पोलिसांची मौज, 8 दिवसात 27 लाखांची बिर्याणी केली फस्त

तब्बल 18 वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव दौऱ्यातून माघार घेतली

Updated: Sep 21, 2021, 08:33 PM IST
न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेत तैनात पाकिस्तानी पोलिसांची मौज, 8 दिवसात 27 लाखांची बिर्याणी केली फस्त

इस्लामाबाद : न्यूझीलंड क्रिकेट संघ नुकताच पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तानदरम्यान (Pakistan) एकदिवसीय आणि टी -20 मालिका खेळवली जाणार होती. पण न्यूझीलंड संघाने सुरक्षेचे कारण देत अचानक दौऱ्यातून माघार घेतली. पाकिस्तानने न्यूझीलंडवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

सुरक्षेवरुन पाकिस्तानची जगभरात नाचक्की होत असतानाच आता या दौऱ्याशी संबंधित असलेल्या पाकिस्तानी पोलिसांचा एक कारनामा समोर आला आहे. न्यूझीलंर संघाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी पोलीस तैनात करण्यात आले होते. या पोलिसांनी 8 दिवसात तब्बल 27 लाख रुपयांची बिर्याणी फस्त केल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानमधल्या एका टीव्ही चॅनेलने हा दावा केला आहे. 

चॅनेलने दिलेल्या रिपोर्टनुसार न्यूझीलंडचा संघाचा इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये मुक्काम होता. याठिकाणी इस्लामाबाद पोलीस खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. एकूण 500 पोलिसांची ड्यूटी हॉटेलमध्ये होती. यामध्ये पाच एसपी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पोलिसांच्या जेवणाचं बिल 27 लाख रुपये झालं आहे. अहवालात असं म्हटले आहे की, सुरक्षेत तैनात असलेले पोलीस दिवसातून दोनदा बिर्याणी खात होते. याचं बिल 27 लाख रुपये इतकं झालं आहे.

हॉटेलचं बिल मंजूरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर हे बिल तातडीने थांबवण्यात आलं. ते अद्याप मंजूर करण्यात आलेलं नाही. किवी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी फ्रंटियर कॉन्स्टब्युलरीचे जवानही तैनात करण्यात आले होते. अजून त्यांच्या जेवणाचं बिल येणं बाकी आहे. 

18 वर्षांनंतर न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ तब्बल 18 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. पण पहिल्या सामन्याच्याच दिवशीच न्यूझीलंडने सुरक्षेचं कारण देत माघार घेतली. मात्र हा दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला होता.