सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट केल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणतो, 'मला तर...'

मी जिथे लहानाचा मोठा झालो तिथे खेळाडूंना म्हशींचा सन्मान करताना तसंच तूपाचं सेवन करताना पाहिलं आहे असं नीरज चोप्रा म्हणाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 18, 2024, 12:25 PM IST
सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट केल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणतो, 'मला तर...' title=

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) सत्कार करताना वेगवेगळ्या भेटी दिल्या जात आहेत. मात्र यावेळी अर्शद नदीमला त्याच्या सासऱ्यांनी दिलेल्या भेटीची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. 27 वर्षीय अर्शद नदीमला त्याच्या सासऱ्यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल चक्क म्हैस दिली आहे. अर्शद नदीम जिथे राहतो तिथे हा मोठा पुरस्कार म्हणून पाहिला जातो. पण इतर ठिकाणी मात्र यावरुन खिल्ली उडवली जात आहे. स्वत: नदीमनेही यावरुन टोला लगावला आहे.  

अर्शद नदीमला सासऱ्यांनी म्हैस भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रानेही यावर प्रतिक्रिया दिली असून, आपल्याला अशा भेटी दिलं जात नसल्याचं काही नवल वाटत नसून, मलाही सवय आहे असं सांगितलं आहे. नीरज चोप्राने सांगितलं की, "मला एकदा देशी तूप देण्यात आलं होतं. हरियाणात असताना मलाही अशा भेटी देण्यात आल्या होत्या. 10 किंवा 50 किलोंचं देशी तूप किंवा लाडू दिले जात होते". नीरज चोप्राने जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सच्या माध्यमातून माध्यमांशी संवाद साधताना हे सांगितलं.

"नीरज जर स्पर्धा जिंकला तर आम्ही 50 किलो तूप देऊ अशी आश्वासनं दिली जात असतात. मी जिथून आहे तिथे कबड्डी, कुस्ती फार प्रसिद्ध असून तेव्हापासून अशा गोष्टी ऐकत आलो आहे. तूप भेट म्हणून दिलं जातं कारण त्यामुळे ताकद वाढण्यात मदत होते. आमच्या खेळात त्याचीच गरज असते. आमच्या येथे म्हैसही भेट म्हणून दिली जाते. कुस्तीपटू आणि कबड्डी खेळाडूंना बुलेट मोटर किंवा ट्रॅक्टरही दिले जातात," असं नीरज चोप्रा म्हणाला.

नदीमने ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर दूर भाला फेकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नदीमच्या विक्रमी कामगिरीनंतर नीरज चोप्रासमोर 90 मीटर अंतर पार करण्याचं आवाहन होतं. नदीमने भाला फेकल्यानंतर आपल्यालाही आपण अंतर पार करु असा विश्वास होता असं नीरज म्हणाला.
 
"मला 1 टक्केही शंका नव्हती की मी चांगलं करू शकत नाही. भालाफेकीत तुमचे अंतर 3-4 मीटरने वाढवणं ही फार मोठी गोष्ट नाही", असं नीरज म्हणाला. यावेळी त्याने कबूल केलं की हे करण्यासाठी तो मानसिकदृष्ट्या सक्षम असताना शरीराने मात्र हवी तशी साथ दिली नाही. नीरज ऑलिम्पिक दरम्यान मांडीच्या दुखापतीतून सावरला होता. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर दूर भाला फेकला होता, जे त्याच्या हंगामातील सर्वोत्तम आणि टोकियोमधील अंतरापेक्षा जास्त होते जिझे 2021 मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

“मी इतकं अंतर पार करू शकलो नसतो असं नाही. पण मी स्वतःला इतकं पुढे ढकलू शकलो नाही. मानसिकदृष्ट्या मी तयार होतो पण शारीरिकदृष्ट्या मी स्वत:ला रोखून धरलं होतं. धावपट्टीवर माझं धावणं योग्य प्रकारे नव्हतं. त्याची भरपाई करण्यासाठी मी थ्रोमध्ये करण्याचा प्रयत्न करत होतो. जोपर्यंत तुमचे लेगवर्क आणि तंत्र चांगले नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला कितीही ढकलले तरी फायदा होत नाही," असं नीरज म्हणाला.