Paris Olympics 2024 Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवण्याच्या अपेक्षा मंगळवारी कुस्तीपटू विनेश फोगाटच्या कामगिरीमुळे वाढल्या आहेत. मागील काही काळापासून खेळापेक्षा आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या विनेशने ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. विनेशने मंगळवारी क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लौपेझ हिचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. विनेशच्या या कामगिरीमुळे भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. विनेशनच्या या घवघवीत यशानंतर आता अनेकांना काही महिन्यांपूर्वी कशापद्धतीने तिला आंदोलनादरम्यान वागणूक देण्यात आली यावरुन टीका होताना दिसत आहे. ऑलिम्पिकच्या मॅटवरील विनेशनचे विजयानंतरचा फोटो आणि रस्त्यावर तिला पोलीस खेचून घेऊन जात असल्याचे फोटो व्हायरल झालेले असतानाच आंदोलनातील तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या पोस्टमधून कुस्तीपटूंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना कठोर शब्दांमध्ये खडे बोल सुनावले आहेत.
विनेशनच्या कालच्या कामगिरीदरम्यान आधी बजरंगने तिच्या कामगिरीबद्दल एक पोस्ट केली. "विनेश फोगाट ही भारताची ती वाघीण आहे जिने एकामागोमाग एक सामने जिंकले. 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या आणि सध्याच्या ऑलिम्पिक चॅम्पियनला तिने पराभूत केलं. त्यानंतर तिने उपउपात्यं फेरीमध्ये माजी वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत केलं," असं म्हणत बजरंग पुनियाने विनेशच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मात्र पुढे बोलताना बजरंग पुनियाने काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा संदर्भ देत "याच मुलीला तिच्याच देशात पायाखाली तुडवण्यात आलं," असं म्हटलं आहे. "मात्र एक गोष्ट सांगू का, या मुलीला तिच्याच देशात पायाखाली तुडवलं गेलं. याच मुलीला तिच्या देशात रस्त्यावरुन खेचत नेण्यात आलं. ही मुलगी आता (ऑलिम्पिकमध्ये) जग जिंकणार आहे. मात्र आपल्या देशातील सिस्टीमविरुद्ध पराभूत झाली," असं म्हणत आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे.
विनेश फोगाटने अंतिम फेरीमध्ये धडक मारल्यानंतर बजरंग पुनियाने पुन्हा एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये विनेश हातात तिरंगा घेऊन हसतानाचा फोटोही जोडलेला आहे. "विनेशने आज इतिहास घडवला आहे. विनेश महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. आज सर्व भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आहेत," असं बजरंगने म्हटलं आहे. मात्र पुढे त्याने, "देशाच्या याच मुलींनी कायम देशाचा सन्मान वाढवला आहे. ज्या लोकांनी कायमच या मुलींच्या वाटेत काटे पसरवण्याचं काम केलं त्यांनी या मुलींकडून धडा घेतला पाहिजे. तसेच भविष्यात या मुलींच्या वाटेत काटे टाकले जाणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारीही या लोकांचीच आहे," असा टोला लगावला आहे.
अंतिम फेरीमध्ये पोहचलेल्या विशेनचा पदकासाठीचा सामना आज म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री पावणेदहा वाजता होणार आहे. संपूर्ण भारताचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं असून विनेश नक्कीच सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास तिचे वडील आणि माजी कुस्तीपटू महावीर फोगाट यांनी व्यक्त केला आहे.