पंतप्रधान मोदींनी विराट-अनुष्काला अशा दिल्या शुभेच्छा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

Updated: Sep 18, 2020, 05:24 PM IST
पंतप्रधान मोदींनी विराट-अनुष्काला अशा दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अनुष्का शर्मा ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे. काहीच दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काने ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. यानंतर या दोघांवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. गुरुवारी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. विराटने दिलेल्या या शुभेच्छांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली. 'धन्यवाद विराट कोहली. मीही तुला आणि अनुष्का शर्माला शुभेच्छा देतो. तुम्ही दोघं चांगले पालक बनाल, असा विश्वास मला आहे,' असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जानेवारी २०२१ मध्ये अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार आहे. 

विराट कोहली हा सध्या युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी गेला आहे. आयपीएलमध्ये विराट बंगळुरूच्या टीमचा कर्णधार आहे. यंदाच्या वर्षी विराट आणि त्याच्या टीमपुढे पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी पटकवण्याचं आव्हान असेल. २०१६ साली बंगळुरूची टीम आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती. फायनलमध्ये हैदराबादने बंगळुरूचा पराभव केला होता. याशिवाय बंगळुरूच्या टीमला एवढी चांगली कामगिरी करता आलेली नाही.