नवी दिल्ली : शनिवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून IPL 2020 आयपीएल या क्रिकेट स्पर्धेला पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरसचं सावट असल्यामुळं यंदाच्या वर्षी काही महिने उशिरानं का असेना, पण आयपीएलचं नवं पर्व सुरु होणार आहे. त्यासोबतच सुरुवात होणार आहे ती म्हणजे सट्टाबाजाराला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबईच्या संघाला सट्टेबाजांची, बुकींची विशेष पसंती आहे. त्यांच्यावर ४.९० रुपये इतका भाव लावण्यात आला आहे. मुंबई मागोमाग हैदराबादच्या संघाला बुकींकडून पसंती दिली जात असल्याचं कळत आहे.
युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या शुभारंभाच्या काही तास आधीच गुरुग्राम पोलिसांनी त्यांची इंटेलिजंट विंग, क्राईम ब्रांचचा एक चमू आणि सर्व जिल्ह्यांतील स्टेशन ऑफिसर यांना सट्टेबाजांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय गुन्हेगारांवरही यावेळी करडी नजर असेल. एकिकडे सट्टेबाजार आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेल्या असतानाच दुसरीकडे बुकींनीही विविध संघांवर बोली लावण्यास सुरुवात केल्याची माहिती उघड होत आहे.
आयपीएलच्या मागील पर्वात मुंबईच्या संघाची कामगिरी पाहता रोहित शर्मा या खेळाडूला बुकींची सर्वाधिक पसंती मिळत आहे. अशाच एका सट्टेबाजानं दिलेल्या माहितीनुसार काही संघांच्या किमती खालीलप्रमाणे...
मुंबई- 4.90 रुपये
हैदराबाद - 5.60 रुपये
चेन्नई- 5 रुपये
बंगळुरू - 6.20 रुपये
दिल्ली - 6.40 रुपये
कोलकाता- 7.80 रुपये
पंजाब - 9.50 रुपये
राजस्थान - 10 रुपये
त्याच्याकडूनच मिळालेल्या माहितीनुसार ज्या संघाची किंमत कमी तो संघ सर्वात भक्कम. जर कोणी मुंबईच्या संघावर १००० रुपये लावले आणि संघ जिंकला तर, त्या व्यक्तीला ४९०० रुपये मिळणा. सामन्याचे दर हे सतत बदलत असतात. आयपीएल ही एक मोठी स्पर्धा असून ती रद्द होणं म्हणजे मोठी नुकसानाची बाब असंही या सट्टेबाजानं सांगितल्याचं वृत्त 'झी न्यूज हिंदी'नं प्रसिद्ध केलं. मुख्य म्हणजे अनेकजण सट्टा जिंकून मिळालेल्या या पैशांचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि व्यापारात लावण्यासाठी करतात अशीही माहिती त्यानं दिली. अनेक मेट्रोपोलिटन शहरं आणि लहान शहरंही सट्टेबाजीची केंद्र बनू लागली आहेत. अशा अनेक शहरांमध्ये येत्या काही दिवसांत कोट्यवधींचा सट्टा लागण्याची चिन्हं आहेत. मुख्य म्हणजे या साऱ्या हालचालींवर पोलिसांचीही करडी नजर आहे. तेव्हा आता पुढील दिवसांत सट्टेबाजारातील घडामोडींवर अनेकांचं लक्ष असेल हे नक्की.