'टीम इंडिया'मध्ये निवड होताच पृथ्वी-संजूचा धमाका

शिखर धवनऐवजी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांनी पहिल्याच दिवशी धमाका केला आहे.

Updated: Jan 22, 2020, 08:06 PM IST
'टीम इंडिया'मध्ये निवड होताच पृथ्वी-संजूचा धमाका

वेलिंग्टन : शिखर धवनऐवजी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांनी पहिल्याच दिवशी धमाका केला आहे. न्यूझीलंड-ए आणि भारत-ए यांच्यात झालेल्या अनधिकृत वनडे मॅचमध्ये या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या मॅचमध्ये भारत-एचा ५ विकेटने विजय झाला आहे. तसंच भारताने ३ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे.

भारत-एचा कर्णधार शुभमन गिलने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी गिलचा हा निर्णय योग्य ठरवला. भारताने न्यूझीलंड-एला ४८.३ ओव्हरमध्ये २३० रनवर ऑल आऊट केलं. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर खलील अहमद आणि अक्षर पटेलला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. विजय शंकर आणि राहुल चहरने एक-एक विकेट घेतली. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने ४९ रन आणि कर्णधार टॉम ब्रुसने ४७ रनची खेळी केली.

भारताने या आव्हानाचा पाठलाग आक्रमकपणे केला. फक्त २९.३ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून भारताने हे आव्हान पूर्ण केलं. भारताकडून सर्वाधिक रन ओपनर पृथ्वी शॉने केल्या. ३५ बॉलमध्ये ४८ रन करुन शॉ आऊट झाला. चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या संजू सॅमसनने २१ बॉलमध्ये ३९ रनची खेळी केली.

भारताच्या कोणत्याच बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. सूर्यकुमार यादवने ३५ रन, शुभमन गिलने ३० रन, मयंक अग्रवालने २९ रन केले. विजय शंकर २० रनवर नाबाद आणि कृणाल पांड्या १५ रनवर नाबाद राहिला.

शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे भारताच्या टी-२० टीममध्ये संजू सॅमसनची तर वनडे टीममध्ये पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये फिल्डिंग करताना शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टी-२० २४ जानेवारीला होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारत ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.