नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननं विजय झाला. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या दोन्ही टेस्ट भारताला गमवाव्या लागल्या. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं. पण आता चौथ्या टेस्ट आधी भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. चौथ्या टेस्टमध्ये आर.अश्विनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
तिसऱ्या टेस्टदरम्यान अश्विनच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. पहिल्या इनिंगमध्ये अश्विननं फक्त १ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २२.५ ओव्हर टाकल्या. या मॅचमध्ये अश्विनला फक्त १ विकेट मिळाली. जेम्स अंडरसनची शेवटची विकेट घेऊन अश्विननं भारताला जिंकवून दिलं.
चौथ्या टेस्टसाठी अश्विन फिट आहे का नाही हे भारतीय टीमचा सराव सुरु झाल्यावरच कळेल. पण या टेस्टला अश्विन मुकला तर त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाला संधी देण्यात येईल. जडेजानं ३६ टेस्ट मॅचमध्ये १७१ विकेट घेतल्या आहेत. या सीरिजमधली एकही टेस्ट जडेजा खेळला नाही.
तिसऱ्या टेस्टनंतर भारतीय टीममध्ये २ बदल करण्यात आले. मुरली विजय आणि कुलदीप यादवला टीममधून वगळण्यात आलं. तर पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. ३० ऑगस्टपासून चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.