हॅमिल्टन : न्यूझीलंडला टी-२० सीरिजमध्ये ५-०ने धूळ चारल्यानंतर भारतीय टीम वनडे सीरिजसाठी सज्ज झाली आहे. या वनडे सीरिजमध्ये मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ओपनिंगला बॅटिंग करतील, असं कर्णधार विराट कोहलीने सांगितलं आहे. पाचव्या टी-२० मॅचवेळी बॅटिंग करत असताना रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे रोहित वनडे आणि टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला.
रोहितच्याऐवजी वनडे टीममध्ये मयंक अग्रवाल तर टेस्ट टीममध्ये शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. बुधवार ५ फेब्रुवारीपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांचं वनडे क्रिकेटमध्ये हे पदार्पण असेल.
रोहितला दुखापत झाल्यामुळे केएल राहुल ओपनिंगला येणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता, पण कर्णधार विराटने मात्र राहुल हा मधल्या फळीतच खेळेल, असं स्पष्ट सांगितलं आहे. राहुलने विकेट कीपिंग आणि मधल्या फळीत बॅटिंग करावी. राहुलला त्याच्या या दुहेरी भूमिकेची सवय व्हावी, म्हणून आम्ही ही रणनिती कायम ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचवेळी बॅटिंग करत असताना ऋषभ पंतच्या डोक्याला बॉल लागला. दुखापतीमुळे पंत उरलेल्या मॅच खेळू शकला नाही, त्यामुळे राहुलने विकेट कीपिंग केली. विकेट कीपिंग आणि मधल्या फळीत बॅटिंग करताना राहुलने उल्लेखनीय कामगिरी केली, त्यामुळे राहुलला याच भूमिकेत खेळवण्याचा निर्णय भारतीय टीम प्रशासनाने घेतला.
भारताची वनडे टीम
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केदार जाधव
भारताची टेस्ट टीम
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा