Video: पुजारा चिटर, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या हिरोवर चाहते भडकले

भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या चेतेश्वर पुजाराला रोषाचा सामना करावा लागतोय.

Updated: Jan 28, 2019, 06:57 PM IST
Video: पुजारा चिटर, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या हिरोवर चाहते भडकले

बंगळुरू : भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या चेतेश्वर पुजाराला रोषाचा सामना करावा लागतोय. चिटर म्हणत स्टेडियममधल्या प्रेक्षकांनी चेतेश्वर पुजाराची हेटाळणी केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटक आणि सौराष्ट्रच्या सेमी फायनलवेळी ही घटना घडली. कर्नाटकनं ठेवलेल्या २७९ धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रची अवस्था २३ रनवर ३ विकेट अशी होती. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि शेल्डन जेक्सननं सौराष्ट्रचा डाव सावरायला मदत केली.

सौराष्ट्रच्या इनिंगला आकार देत असताना ६८/३ असा स्कोअर असताना विनय कुमारच्या बॉलिंगवर पुजाराच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि विकेट कीपर श्रीनिवास शरथनं कॅच पकडला. यानंतर कर्नाटकच्या खेळाडूंनी जल्लोषाला सुरुवात केली, पण अंपायरनी पुजाराला आऊट दिलं नाही. त्यावेळी पुजारा ३४ रनवर खेळत होता.

बॅटच्या कडेला बॉल लागूनही पुजारा माघारी परतला नसल्यामुळे पुजारावर कर्नाटकचे चाहते भडकले. चहापानाच्या विश्रांतीसाठी पॅव्हेलियनमध्ये जात असताना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममधल्या काही चाहत्यांनी पुजाराला चिटर म्हणत आपला राग काढला.

कर्नाटकविरुद्धच्या या मॅचमध्ये सौराष्ट्रचा ५ विकेटनी विजय झाला आहे. यामुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. कर्नाटकनं ठेवलेल्या २७९ धावांचा पाठलाग चेतेश्वर पुजारानं नाबाद १३१ रन आणि शेल्डन जेक्सननं १०० रनची खेळी केली. 

पुजाराचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं हे ४९वं शतक आहे. तर जॅक्सनचं हे १६वं प्रथम श्रेणी शतक आहे. पुजारानं २६६ बॉलमध्ये १७ फोरच्या मदतीनं नाबाद १३१ धावा केल्या. तर शेल्डन जॅक्सननं २१७ बॉलमध्ये १०० धावांची खेळी केली, यामध्ये १५ फोरचा समावेश होता.

सौराष्ट्रच्या आधी पहिल्या सेमी फायनलमध्ये विदर्भनं केरळचा पराभव करत फायनल गाठली आहे. आता विदर्भ आणि सौराष्ट्रमध्ये ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रणजी ट्रॉफीची फायनल रंगेल. २०१७-१८ च्या मागच्या मोसमामध्ये विदर्भनं पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा हीच कामगिरी करण्यासाठी विदर्भचा संघ सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे सौराष्ट्रला अजून एकदाही रणजी ट्रॉफी जिंकता आली नाही.

पुजारामुळे ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये पुजारानं ३ शतकं आणि एक अर्धशतक करत ५२१ रन केल्या होत्या. या कामगिरीमुळे पुजाराला मालिकाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. पुजाराच्या या कामगिरीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज २-१नं जिंकली होती. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा टेस्ट सीरिज विजय होता.