मुंबई : रणजी ट्रॉफीच्या २०१९-२० या मोसमात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. चौथ्या राऊंडच्या मुकाबल्यात कर्नाटकने मुंबईचा ५ विकेटने पराभव केला आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानात हा सामना खेळवला गेला. या मॅचमध्ये कर्नाटकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईची टीम १९४ रनवर ऑल आऊट झाली. कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ७७ रन केले. कर्नाटककडून व्ही.कौशिकने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
कर्नाटकच्या टीमला पहिल्या इनिंगमध्ये २१८ रन करता आल्या. रवीकुमार समर्थने सर्वाधिक ८६ रन केले. मुंबईकडून शशांक अर्तडेने ५ विकेट घेतल्या, तर शम्स मुलानीला ३ विकेट मिळाल्या.
४१ वेळा रणजी ट्रॉफी चॅम्पियन ठरलेल्या मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्येही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सरफराज खानने केलेल्या ७१ रननंतरही मुंबईला फक्त १४९ रन करता आल्या. मुंबईच्या ६ बॅट्समनना १० रनचा आकडाही गाठता आला नाही. कर्नाटककडून प्रतीक जैनने ४ विकेट आणि अभिमन्यू मिथूनने ३ विकेट घेतल्या.
कर्नाटकला ही मॅच जिंकण्यासाठी १२६ रनचं आव्हान मिळालं. २४.३ ओव्हरमध्येच ५ विकेट गमावून कर्नाटकने हे आव्हान पूर्ण केलं. देवदत्त पड्डिकलने ५० रन आणि रवीकुमार समर्थने ३४ रन केले. शशांक अर्तडेने दुसऱ्या इनिंगमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. शशांकने ५२ रन देऊन ४ विकेट घेतल्या. कर्नाटकच्या रवीकुमार समर्थला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मुंबईची यंदाच्या रणजी मोसमातला ३ मॅचमधला हा दुसरा पराभव आहे. याआधी रेल्वेने मुंबईला १० विकेटने पराभूत केलं होतं. तर कर्नाटकचा या मोसमातला ४ मॅचमधला हा दुसरा विजय आहे. कर्नाटकच्या उरलेल्या २ मॅच या ड्रॉ झाल्या. पॉईंट्स टेबलमध्ये कर्नाटकची टीम १६ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबची टीम १७ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईकडे सध्या ६ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम १३व्या क्रमांकावर आहे.