नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आधीच खराब कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीच्या टीमचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. गंभीरच्याऐवजी आता श्रेयस अय्यरकडे टीमचं नेतृत्व असणार आहे. याआधी गंभीर कोलकात्याच्या टीमचा कर्णधार होता. पण लिलावाआधी गंभीरनं आपल्याला कोलकात्याकडून खेळायचं नसून दिल्लीकडून खेळायचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच मला रिटेन करु नका किंवा लिलावातही विकत घेऊ नका, अशी विनंतीही गंभीरनं कोलकात्याच्या मालकांना केली होती. यानंतर झालेल्या लिलावामध्ये दिल्लीनं गंभीरला २कोटी रुपयांना विकत घेतलं आणि त्याला कर्णधार बनवलं. गंभीरच्या नेतृत्वात खेळताना कोलकाता दोन वेळा आयपीएल जिंकली होती.
मी कर्णधारपदाचा दबाव झेलू शकलो नाही म्हणून राजीनामा देत आहे. हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. तसंच फ्रेंचायजीकडून माझ्यावर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. हा निर्णय घेण्याआधी मी माझ्या पत्नीशी बोललो होतो, असा खुलासा गौतम गंभीरनं केला आहे.
यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये दिल्लीच्या टीमची आणि गौतम गंभीरची कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही. गेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात त्यांना मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. केवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. संघाच्या या खराब कामगिरीमुळे ते आयपीएलच्या गुणतक्त्यात तळाच्या स्थानी आहेत. मुंबई आणि दिल्लीचे गुण समान आहेत. मात्र दिल्लीचा रनरेट -1.0 असल्याने दिल्लीचा संघ तळाला आहे. गौतम गंभीरलाही या मोसमामध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. याआधीच्या मॅचमध्ये पंजाबनं दिल्लीचा ४ रननी पराभव केला होता. दिल्लीची टीम विजयाच्या जवळ असताना पराभव झाल्यामुळे गंभीर नाराज झाला होता.
आयपीएलच्या १५४ मॅचमध्ये गंभीरनं ४२१७ रन केल्या आहेत. यामध्ये ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधला गंभीरचा सर्वाधिक स्कोअर ९३ रन आहे.