बीसीसीयआने वार्षिक करारातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ईशान किशन चर्चेत आहेत. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आलं होतं. पण खराब कामगिरीमुळे नंतरच्या तीन कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आलं. यानंतर त्याने पाठदुखीचा त्रास होत असल्याने मुंबईकडून रणजी खेळण्यास नकार देत, विश्रांती घेतली. दरम्यान 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, एनसीएने त्याच्याबद्दल विरोधाभासी फिटनेस अहवाल दिला आहे.
यादरम्यान अनेक प्रसारमाध्यमांनी श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅम्पला हजेरी लावल्याचं वृत्त दिलं. यामुळे बीसीसीआयचे निवडकर्ते नाराज झाले होते. याच निवडकर्त्यांनी वार्षिक करारातील खेळाडूंच्या नावाचा निर्णय घेतला आहे.
Revsportz च्या रिपोर्टनुसार, आपल्या वर्कलोडसाठी श्रेयस अय्यरने आयपीएल कॅम्पला हजेरी लावली होती. "एका सेशनमध्ये 60 चेंडू खेळल्यानंतर त्याच्या पाठीमागे उबळ निर्माण होत होती. यामुळे त्याला आपला प्रतिकार वाढवावा लागला. तो आता प्रत्येक सेशनला 200 चेंडू खेळत आहे. तीन आठवड्यात त्याने स्नायूंचं वजन तीन किलोने वाढवलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक ओमकार साळवी यांना संपर्कात ठेवण्यात आलं होतं. मुंबईचे प्रशिक्षक श्रेयस अय्यरमधील सुधारणा पाहण्यासाठी कोलकाताच्या कॅम्पमध्येही आले होते. आता तो रणजीमध्ये तामिळनाडूविरोधात होणाऱ्या सेमी-फायलनसाठी उपलब्ध झाला आहे," असं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितलं आहे.
"श्रेयस अय्यरने वर्ल्डकप खेळण्यासाठी आयपीएलला डावललं. सर्जरीनंतरही त्याने वर्ल्डकपमध्ये उपलब्ध होण्यासाठी तीन पेनकिलर इंजेक्शन घेतले. पण तरीही सेमी-फायनल आणि फायनल सामन्यात त्याला वेदना होत होत्या, पण तरीही तो खेळला. वर्ल्डकपनंतर विश्रांती न मिळालेला श्रेयस अय्यर एकमेव खेळाडू होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात टी-20 मालिका खेळली आणि नंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही होता. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्याला जानेवारी महिन्यात रणजी सामना खेळण्यास सांगण्यात आलं. तसंच इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामनेही खेळला. एखाद्या खेळाडूला त्याच्या निवडीच्या प्रशिक्षकाअंतर्गत ट्रेन होण्याची परवानगी नाही का?," अशी विचारणा त्याने केली आहे.
1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेले भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज मदनलाल यांनी ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळल्यानंतर बीसीसीआयचं कौतुक केलं आहे. बीसीसीआयने किशन आणि अय्यर यांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयामागील कारण उघड केलेलं नाही. एनसीएने फिट असल्याचा रिपोर्ट दिलेला असतानाही दोघांनी त्यांच्या राज्याच्या संघांकडून स्थानिक क्रिकेट न खेळल्याने बोर्ड त्यांच्यावर नाखूश असल्याची माहिती आहे. जे प्रथम श्रेणी सामन्यांपेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केलं पाहिजे असं मदनलाल म्हणाले आहेत.
"जर बीसीसीआय त्यांना प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास सांगत असेल, तर त्यांनी तो खेळला पाहिजे. कोणीही खेळापेक्षा मोठं नाही. बीसीसीआय प्रथम श्रेणी क्रिकेट अनिवार्य करत असल्याचा निर्णय स्तुत्य आहे. सध्या अनेक खेळाडू आयपीएलमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटला गृहित धरत आहेत," अशी नाराजी त्यांनी जाहीर केली आहे.