Rishabh Pant About Fake Injury : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने बार्बाडोसमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियनशिप जिंकली. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूने भारताला हा वर्ल्ड कप जिंकवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये रोहित शर्माने ऋषभच्या फेक इंजरीची टीम इंडियाला फायनलमध्ये मदत झाली असे म्हंटलं होतं. आता एका मुलाखतीत पंतने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सहित काही क्रिकेटर्स 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' च्या तिसऱ्या एपिसोडचा भाग होते. यावेळी कपिने रोहितला विचारले की फायनल सामन्यात 30 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना मैदानात तुम्ही किती प्रेशर खाली होतात काय परिस्तिथी होती? तेव्हा रोहित म्हणाला की 'डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन हे क्रीजवर होते. तेव्हा मी हार्दिकशी काहीतरी बोलत फिल्डिंग सेट करत होतो. तेव्हा मी पाहिलं ऋषभ पंत जमिनीवर झोपला आहे आणि टीमचा फिजिओ त्याच्या पायाला पट्टी लावत आहे. पंतने यात खूप वेळ घेतला आणि त्यामुळे गेम थोडा स्लो डाऊन झाला. हे सुद्धा आमच्या विजयाचं एक कारण राहीलं असं मला वाटतं'.
स्टार स्पोर्ट्सच्या एका इव्हेंटमध्ये ऋषभ पंतला वर्ल्ड कप फायनलमधील याच फेक इंजरी बाबत विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पंतने सांगितले की, 'अचानक मोमेंटम शिफ्ट झाला होता. 2-3 ओव्हरमध्ये खूप जास्त धावा गेल्या होत्या. 24 बॉलमध्ये 26 धावा हव्या असताना मी मैदानात गुडघा पकडून बसलो. तेवढ्यात फिजिओ तेथे आला. मी फिजिओला म्हंटले की, टाईम लावा, आपल्याला थोडा टाईमवेस्ट घालवायचा आहे. त्यांनी मला विचारलं गुडघा ठीक आहे? यावर मी म्हणालो सगळं ठीक आहे, मी फक्त एक्टिंग करतोय'.
डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यामुळे पंत तब्बल दीड वर्ष क्रिकेट मैदानापासून दूर होता. मग पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये त्याने दमदार शतक ठोकले.
भारताने 2007 रोजी एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र त्यानंतर 17 वर्षात एकदाही टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकणे शक्य झाले नव्हते. मात्र यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेला टी 20 वर्ल्ड कप 2024 टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकला. त्यामुळे रोहित शर्मा हा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा दुसरा कर्णधार ठरला.