नवी दिल्ली : ‘मॅन ऑफ द मॅच’ रोहित शर्मा(८९) आणि सुरेश रैना(४७) यांच्यात झालेल्या शतकीय भागीदारीनंतर वॉशिंगटन सुंदर(२२-३)च्या जोरावर टीम इंडियाने बुधवारी बांगलादेशला १७ रन्सने मात दिली. आता फायनलमध्ये टीम इंडियाची जागा निश्चित झालीये.
टीम इंडियाने आर. प्रेमदारा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशसमोर १७७ रन्सचे लक्ष्य ठेवले होते. बांगलादेश टीम मुश्फीकुर रहीमच्या नाबाद ७२ रन्सच्या खेळीनंतर हे लक्ष्य पूर्ण करू शकले नाही. बांगलादेशने २० ओव्हर्समध्ये सहा विकेट गमावून १५९ रन्स केले. वॉशिंगटन सुंदर व्यतिरीक्त भारताच्या शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलने एक-एक विकेट घेतली.
बांगलादेश विरूद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहित शर्मा फॉर्ममध्ये आल्याचे बघायला मिळाले. त्याने ६१ बॉल्समध्ये ५ फोर आणि पाच सिक्सरच्या मदतीने ८९ रन्सची शानदार खेळी केली. २०१७ मध्ये रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये आपलं तिसरं दुहेरी शतक लगावलं आणि टी-२० मध्ये सर्वाधिक वेगवान शतक लगावणारा क्रिकेटर बनला होता. पण २०१८ ची सुरूवात रोहितसाठी फारशी चांगली झाली नाही. आधी साऊथ आफ्रिके विरूद्ध आणि नंतर श्रीलंकेत सुरू असलेल्या निडास ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आत्तापर्यंत शानदार कामगिरी करू शकला नव्हता.
या सामन्याआधी झालेल्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय खेळींमध्ये रोहित शर्माचा स्कोर १७, ०, ११, ० आणि २१ राहिला. पण बांगलादेश विरूद्ध रोहित शर्माचा फॉर्म पुन्हा दिसला. या सामन्यात रोहित शर्माने आपल्या टी-२० करीअरचं १३वं अर्धशतक लगावलं.
रोहित शर्माने शानदार ८९ रन्सची खेळी करून एक आणखी अर्धशतक आपल्या नावावर केलं. पण यासोबतच त्याने एक खराब रेकॉर्डही आपल्या नावावर केलाय. रोहित शर्माने हे अर्धशतक ४२ बॉल्समध्ये पूर्ण केलं. हे रोहित शर्माचं करिअरमधील पाचवं सर्वात हळुवार अर्धशतक आहे. याआधीही रोहितने ४ वेळा हळुवार अर्धशतक केले आहे.
४४ बॉल, वेस्टइंडीज (२०१४)
४४ बॉल, आयरलंड (२००९)
४२ बॉल, न्यूझीलंड (२०१७)
४२ बॉल, बांगलादेश (२०१६)
४२ बॉल, बांगलादेश (२०१८)
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त रन करण्यात रोहित शर्मा आता आठव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानच्या उमर अकमल(१६९०) सोबतच ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर (१७९२) ला मागे टाकलं आहे. आता रोहित शर्माचे टी-२० आंतरराष्ट्रीय रन १७९६ इतके आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जास्त रन्स करणा-यांच्या यादीत विराट कोहली १९८३ रन्स सोबत तिस-या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल(२२७१) आणि दुस-या क्रमांकावर बॅंडम मॅक्कुलम (२१४०) हा आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे. २०१७ च्या शेवटी श्रीलंके विरूद्ध टी-२० सामन्यात रोहितने हा कारनामा केला होता. रोहितने श्रीलंकेविरूद्ध ४३ बॉल्समध्ये ११८ रन्सची दमदार खेळी केली होई. यावेळी त्याने ३५ बॉल्समध्ये आपलं शतक पूर्ण केलं होतं. यासोबतच तो टी-२० मध्ये सर्वात वेगवान शतक लगावण्याच्या बाबतीत मिलरसोबत संयुक्त रूपाने पहिल्या क्रमांकावर आला.