एशियन गेम्समध्ये खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दाखल झाला आहे. भारतीय फलंदाज ऋतुरात गायकवाडकडे एशियन गेम्समधील क्रिकेट संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघातून खेळताना ऋतुराज गायकवाडला धोनीच्या निमित्ताने नेतृत्व कौशल्य पाहायला मिळालं आहे. दरम्यान ऋतुराज गायकवाडने म्हटलं आहे की, मी महेंद्रसिंग धोनीकडून फार काही शिकलो आहे. पण येथे मी माझ्या स्टाइलप्रमाणे नेतृत्व करणार आहे.
एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यानंतर आता पुरुष संघही अशीच कामगिरी करेल अशी आशा व्यक्त होत आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील संघ मंगळवारी क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. ऋतुराज गायकवाडने आपण संघातील खेळाडूंना व्यक्त होण्याची संधी देणार असल्याचं सांगितलं आहे.
"मला धोनीकडून फार काही शिकायला मिळालं आहे. पण प्रत्येकाची एक वेगळी शैली असते. त्याची शैली, व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. आणि माझं व्यक्तिमत्व थोटं वेगळं आहे," असं ऋतुराज गायकवाडने पहिल्या सामन्याआधी बोलताना सांगितलं. "मी माझ्या पद्धतीने नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. धोनी काय करतो याकडे लक्ष देणार नाही. पण नक्कीच ज्या चांगल्या गोष्टी त्या करतो, त्यांचा तुम्ही अवलंब करु शकता. जसं की ज्याप्रकारे तो परिस्थिती आणि सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूला हाताळतो," असं ऋतुराजने म्हटलं आहे.
"नक्कीच, काही गोष्टींमध्ये तुम्ही आदर्श म्हणून धोनीकडे पाहता. पण मला माझ्या पद्धतीने नेतृत्व करायला आवडेल. खेळाडूंनी स्वत:ला व्यक्त करावं अशी माझी अपेक्षा आहे. तसंच शक्य तेवढं स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न असेल," असं ऋतुराजने सांगितलं. दरम्यान, भारतीय प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणने चीनमध्ये क्रिकेट खेळणं एक विलक्षणीय अनुभव असेल असं म्हटलं आहे. 'हा एक वेगळा सेट अप आहे. चीनमध्ये येऊन आम्ही क्रिकेट खेळू असा विचारही केला नव्हता. संपूर्ण संघासाठी ही एक चांगली संधी आहे,' असं लक्ष्मणने म्हटलं आहे.
"एशियन गेम्समध्ये सहभागी होणं ही एक मोठी संधी असून, सर्व खेळाडूंसाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही या स्पर्धेकडे आतुरतेने पाहत आहोत," असं सांगताना ऋतुराज गायकवाडने सर्व खेळाडू सुवर्णपदक जिंकण्यासाठी आतूर असल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला की "एशियन गेम्समध्ये प्रत्येकजण सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक आहे".
"क्रिकेटमध्ये आम्ही वर्ल्डकप, आयपीएल, स्थानिक स्पर्धा जिंकलो आहोत. आम्हाला अशा वातावरण आणि परिस्थितीची सवय आहे. पण येथे आल्यानंतर आणि ऑलिम्पिक विलेजमध्ये गेल्यानंतर आम्हाला खेळाडूंना कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा लागतो हे समजलं," असं ऋतुराज गायकवाडने म्हटलं.
"2-3 वर्ष किंवा चार वर्षात (किंवा) त्यांना देशासाठी खेळण्याची आणि त्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. गेम्स विलेजला भेट दिल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला आणि हे किती विशेष आहे हे समजलं," असं ऋतुराज गायकवाडने सांगितलं. आपले खेळाडू बॅडमिंटन, टेनिस, हॉकी अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळणं हे फार विशेष आहे. ही अभिमानाची बाब आहे असं त्याने सांगितलं.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. नेपाळने मंगोलियाविरुद्ध खेळताना अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. भारतीय संघही या स्पर्धेत अनेक विक्रम प्रस्थापित करेल अशी आशा आहे.