मुंबई : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही एका अतुट मैत्रीची नावं
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातील मैत्री ही साऱ्या जगाला परिचित आहे. शाळेतील दिवसांपासूनची ही मैत्री क्रिकेटच्या मैदानापर्यंत एकत्र होती. या जोडीने कायमच आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज विनोद कांबळीच्या वाढदिवसादिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास फोटो शेअर करून विनोद कांबळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Tum jiyo hazaaron saal aur saal ke din ho hazaar. Wishing you a very happy birthday, @vinodkambli349. pic.twitter.com/wOLRyfpqck
— sachin tendulkar (@sachin_rt) January 18, 2018
या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने विनोद आणि त्याचे जुने फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे. एकाच शाळेत असलेल्या या दोघांनी क्रिकेटमध्ये रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. शालेय क्रिकेटमध्ये नाबाद ६६४ धावांची भागिदारी करून या जोडीने विक्रम रचला होता. हा विक्रम अनेक वर्षे अबाधित राहिला. पुढे भारतीय संघातूनही हे एकत्र खेळले. मात्र
मधल्या काही काळात या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. जुलै २००९मध्ये एका टीव्ही शो दरम्यान कांबळीने सचिनवर गंभीर आरोप केला होता. मला संघात परतायचे होते मात्र सचिनने माझ्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असे कांबळी म्हणाला होता. कांबळीच्या या आरोपांनी सचिन दुखावला होता. सचिन जाहीरपणे याबाबत कधी बोलला नाही पण दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र तो दुरावा गेल्यावर्षी तब्बल 8 वर्षांनी संपला आहे. एका कार्यक्रमात या दोघांनी गळाभेट घेऊन सारे गैरसमज दूर केले होते.