भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती

भारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे.

Updated: Sep 12, 2018, 06:36 PM IST
भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती

मुंबई : भारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे. बुधवारी सरदार सिंगनं याची घोषणा केली आहे. सरदार सिंग आशियाई स्पर्धेमध्ये खेळलेल्या भारतीय टीमचा हिस्सा होता. या स्पर्धेमध्ये भारताला फायनल गाठता आली नव्हती. भारतानं पाकिस्तानला हरवून कांस्य पदक मिळवलं होतं.

३२ वर्षांच्या सरदार सिंगनं भारतासाठी ३५० पेक्षा जास्त मॅच खेळल्या. १२ वर्षांपेक्षा जास्त काळ खेळल्यावर आता नव्या पिढीसाठी जागा खाली करायची वेळ आली आहे, असं वक्तव्य सरदार सिंगनं केलं आहे.

सर्वात लहान वयात भारतीय टीमचा कर्णधार होण्याचं रेकॉर्ड सरदार सिंगच्या नावावर आहे. सरदार सिंगनं २००८ साली २२व्या वर्षी सुल्तान अजलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचं कर्णधारपद भुषवलं होतं. यानंतर २०१६ सालापर्यंत बहुतेक वेळा सरदार सिंग भारताचा कर्णधार होता. २०१६ साली सरदार सिंगऐवजी गोलकीपर पीआर श्रीजेशकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं.