Sarfaraz Khan : पैशापेक्षा बापाची श्रीमंती! सरफराजचं 'ते' उत्तर ऐकून वडिलांना आलं भरून

Sarfaraz Khan : कधी संघात जागा नाही, तर कधी त्याचा फिटनेस त्याच्या निवडीच्या मध्ये येत आहे, अशी कारणे देत सरफराजला संधी देण्यात आलेली नाही

Updated: Jan 22, 2023, 01:39 PM IST
Sarfaraz Khan : पैशापेक्षा बापाची श्रीमंती! सरफराजचं 'ते' उत्तर ऐकून वडिलांना आलं भरून title=
(फोटो सौजन्य - PTI)

Sarfaraz Khan : रणजी करंडक (ranji trophy) स्पर्धेनंतर सरफराज खान हे नाव सध्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या तोंडावर आहे. सरफराजच्या दमदार खेळीनंतर त्याला डावलल्यानंतर मोठी चर्चा सुरु झालीय. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊनही संघ अडचणीत असताना अविश्वसनीय अशी खेळी करणाऱ्या सरफराजच्या निवडीवरुन क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी नाराजी आहे. सरफराजला संधी न दिल्याबद्दल अनेक कारणं दिली जात आहेत. कधी संघात जागा नाही असे सांगितले जाते. तर कधी त्याचा फिटनेस त्याच्या निवडीमध्ये येत आहे, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे सरफराजच्या वडिलांनाही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला होता. त्यावेळी रणजी स्पर्धेमुळे सरफराज खानचे नाव खूप चर्चेत होते. मात्र दर्जेदार कामगिरी करुनही सरफराजला संधी मिळाली नाही. याबाबत अनेकांनी आपली मतं व्यक्त केली होतं. सरफराजचे वडील नौशाद खान यांनीही याबाबत इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना एक किस्सा सांगितला आहे.

त्या एका मिठीमुळे नौशाद खान भावूक

"सरफराज अनेकदा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनसोबत किंवा त्याच्याविरुद्ध ज्युनियर क्रिकेट खेळत असे. एकदालहान सरफराजने मला सांगितले की, अब्बू, अर्जुन किती नशीबवान आहे ना? तो सचिन सरांचा मुलगा आहे. त्याच्याकडे कार, आयपॅड, सर्व काही आहे", असे म्हणत नौशाद खान भावूक झाले. त्यानंतर लहानग्या सरफराजच्या प्रश्नावर हो असे म्हणत त्यावेळी काहीही भाष्य केले नाही. पण तितक्यात सरफराज धावत आला आणि त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली आणि "मी त्याच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहे. कारण तुम्ही संपूर्ण दिवस माझ्यासाठी देऊ शकता. त्याचे वडील त्याला वेळ देऊ शकत नाहीत," असे म्हटले. यावेळी नौशाद खान यांचाही कंठ दाटून आला.

सरफराजला संधी का नाही?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाल्याने नाराजी व्यक्त करत मोठा खुलासा केला होता. संघ जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या मी रात्रभर झोपू शकलो नाही. मी सारखं स्वतःला मी तिथे का नाही असे विचारत राहिलो. पण, वडिलांशी बोलल्यानंतर मला थोडा धीर मिळाला," असे सरफराजने म्हटले. यासोबत निवडकर्त्यांनी सरफराजला बांगलादेश दौऱ्यावर संधी मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र या दौऱ्यावर त्याला संधी मिळाली नाही. यावेळी त्याने निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी 'तू  निराश होऊ नको तुझी वेळ येईल. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. तू त्याच्या खूप जवळ आहेस. तुलाही संधी मिळेल,' असे सांगितल्याचे सरफराजने म्हटले होते.