विराटला बदलावं लागेल; गांगुली यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद पेटणार?

टीम इंडियाकडून विराट कोहली 100वा टेस्ट सामना खेळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Updated: Mar 3, 2022, 08:46 AM IST
विराटला बदलावं लागेल; गांगुली यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद पेटणार? title=

मुंबई : उद्यापासून श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आणि ऐतिहासिक असणार आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली 100वा टेस्ट सामना खेळणार आहे. 100वा टेस्ट सामना खेळणारा तो 12 खेळाडू असणार आहे. दरम्यान या सामन्यात प्रेक्षकांची उपस्थिती राहणार आहे. अशातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, "कोणत्याही खेळाडूसाठी या उंचीपर्यंत पोहोचणं हे फार खास असतं. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही एक उत्तम खेळाडू असणं गरजेचं आहे. विराट एक महान खेळाडू आणि तो यासाठी नक्कीच पात्र आहे."

गांगुली यांच्या म्हणण्याप्रमाणे, मी त्याच्यासोबत कधी खेळलो नाही. मात्र मी त्याचा गेम नेहमी फॉलो केला आहे. मी आतापर्यंत त्याच्या करियरला फॉलो केलं आहे आणि आता तो महानतेकडे वळताना दिसतोय. 

"2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यात अपयशी झाल्यानंतर त्याने त्याच्या खेळामध्ये बदल केला होता. त्याने केलेला तो बदल वाखणण्याजोगा होता. त्यानंतर त्याने सलग 5 वर्ष चांगली कामगिरी केली," असं सौरव गांगुली यांनी सांगितलं.

बऱ्याच वर्षांनी विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये केवळ एक टीमचा सदस्य आणि फलंदाज म्हणून मैदानावर उतरणार आहे. याविषयी सौरव गांगुली म्हणाले की, "यासाठी विराटला काही बदल नक्कीच करावे लागतील. मात्र विराटसाठी ते नक्कीच कठीण नसेल. त्याला माहितीये की, शतक कसं करायचं आणि लवकरच तो त्याचं शतक ठोकणार आहे."