Rohit Sharma: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. यावेळी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये पहिला सामना खेळवण्यात येतोय. भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अशातच सामन्याच्या मध्ये रोहित शर्माची छोटी मुलाखत घेण्यात आली. यावेळी रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने नेतृत्वाच्या भूमिकेबाबत मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. खेळाडूंनी आकड्यांवर लक्ष केंद्रित न करता नेहमी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावं, असं रोहितचं म्हणणं आहे. रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
पहिल्या टेस्ट सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'ज्यावेळी मला टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी खूप उत्साही होतो. मी गेल्या 7 ते 8 वर्षात निर्णय घेणाऱ्या कोअर ग्रुपचा एक भाग आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मी काहीवेळा टीमच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. आपल्या देशाचं कर्णधार बनणं हा मोठा सन्मान आहे. मी अनेक महान खेळाडू पाहिले आहेत ज्यांनी त्यांच्या पद्धतीने कर्णधारपद भूषवलंय.
रोहितने पुढे सांगितलंय की, मी काहीतरी बदल करू इच्छित होतो. सध्या खेळाडू मैदानावर जाऊन स्वतंत्रपणे खेळतायत. मुळात लोकं नंबर्स किंवा व्यक्तीगत स्कोर पाहत नाहीयेत. मी 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाच शतकं झळकावली होती, पण त्याचं काय झालं, हरलोच ना शेवटी?
गेली तीन वर्षे खूप छान गेली. मात्र त्यामध्ये आयसीसी ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्याचा समावेश नाहीये. आम्ही सर्व काही जिंकले आहे. ही एकमेव अशी ट्रॉफी आहे जी आम्ही मिळवू शकलो नाही. मला वाटतं आमचीही योग्य वेळ येईल, त्यासाठी योग्य मानसिकता ठेवण्याची गरज आहे. आम्हाला भूतकाळाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही ते बदलू शकत नाही. पुढे काय होईल ते तुम्ही बदलू शकता. त्यामुळे आमचे सर्व लक्ष फक्त यावरच केंद्रित आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत, असंही रोहितने सांगितलंय.