'शाहीन आफ्रिदी पाकिस्तान संघात का आहे?,' लेकीच्या प्रश्नावर शाहीद आफ्रिदी आश्चर्यचकित, म्हणाला 'उद्या..'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या लेकीने शाहिन आफ्रिदी संघात का आहे? अशी विचारणा केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2023, 12:00 PM IST
'शाहीन आफ्रिदी पाकिस्तान संघात का आहे?,' लेकीच्या प्रश्नावर शाहीद आफ्रिदी आश्चर्यचकित, म्हणाला 'उद्या..' title=

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवांनंतर पाकिस्तान संघ भारत आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यातही पराभूत झाला आहे. यामुळे पाकिस्तानची सेमी-फायनलची वाट बिकट झाली आहे. पाकिस्तान संघाच्या अपयशामागे अनेक कारणं आहेत. यामधील महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे गोलंदाज निष्प्रभ ठरले आहेत. पाकिस्तान संघाचा कणा असणारे गोलंदाजच अपयशी ठरत असल्याने संपूर्ण कामगिरीवर याचा परिणाम होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने चांगली कामगिरी केली. पण संघाला यश मिळवून देण्यात ती अपुरी ठरली.

यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची लेक वडिलांनी शाहीन आफ्रिदी संघात का आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. शाहिद आफ्रिदीची मुलगी आरवाने ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याआधी हा प्रश्न विचारला होता. 

शाहिद आफ्रिदी आणि त्याची मुलगी आरवा पाकिस्तानमधील एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात पाकिस्तान संघ कशी कामगिरी करु शकतो यावर चर्चा सुरु होती. यादरम्यान अँकर्स आणि शाहिद आफ्रिदी यांनी पाकिस्तान संघ विजयी होईल असा अंदाज वर्तवला होता. शाहिद आफ्रिदीची चिमुरडी लेक आरवाला विचारण्यात आलं असता तिनेही पाकिस्तान असं उत्तर दिल्यानंतर सर्वजण तिचं कौतुक करु लागले होते. 

यानंतर आरवा वडिलांना विचारते की, 'बाबा, शाहीन आफ्रिदीही पाकिस्तान संघात आहे का?'. यावर शाहिद आफ्रिदी उत्तर देतो की, 'हो, शाहीन आफ्रिदी संघात आहे'. यावर आरवा 'तो संघात का आहे?' अशी विचारणा करते. यानंतर सगळेजण हसू लागतात. यानंतर शाहिद आफ्रीदी तिला सांगतो की, "जेव्हा तो चांगली कामगिरी करु शकणार नाही, तेव्हा आपण हा प्रश्न विचारु".

गुणतालिकेत पाकिस्तान संघ सध्या 5 व्या स्थानावर आहे. पाकिस्तानने 4 पैकी 2 सामने जिंकले असून, 2 सामन्यात पराभव झाला आहे. पाकिस्तानने भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन तगड्या संघांविरोधात सामने गमावले आहेत. दोन्ही संघ मजबूत असल्याने या पराभवामुळे पाकिस्तानी खेळाडू पूर्णपणे खचले नसावेत. त्यातही ऑस्ट्रेलियाविरोधात शाहीन आफ्रिदीने चांगली गोलंदाजी केली असल्याने, तो पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

शाहीन आफ्रिदीचं शाहिदच्या लेकीशी लग्न

शाहीन आफ्रिदी हा शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. शाहीन आफ्रिदी आणि अंशाने 3 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वी या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन दिलं. अंशा ही शाहीद आफ्रिदीची मुलगी आहे.