पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) इंग्लंडविरोधातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाबर आझम (Babar Azam), शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि नसीम शाह (Naseem Shah) यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मुलतानमधील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पीसीबीने नवी निवड समिती गठीत केली आहे. या नव्या समितीत आकिब जावेद, अझहर अली, अलीम दार, हसन चीमा आणि सल्लागार बिलाल अफझल यांचा समावेश आहे. या नव्या निवड समितीने बाबर, शाहीन आणि नसीमला वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, खेळाडूंना वगळण्याऐवजी त्यांना विश्रांती देण्यात आल्याचे माजी वेगवान गोलंदाज जावेदने ठणकावून सांगितले. दरम्यान खेळाडूंना संघातून वगळल्यानंर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने यावर भाष्य केलं आहे.
शाहीद आफ्रिदी हा शाहीन आफ्रिदीचा सासराही आहे. शाहीद आफ्रिदीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बोर्डाच्या या निर्णयाचा खेळाडूंना फायदा होईल आणि नव्या खेळाडूंना संधी देता येईल असं शाहीद आफ्रिदीने सांगितलं आहे.
"बाबर, नसीन, शाहीनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याच्या निवडकर्त्यांच्या निर्णयाचं मी समर्थन करत आहे. हे पाऊल या चॅम्पियन खेळाडूंच्या करिअरचे संरक्षण आणि विस्तार करण्यास मदत करेलच, शिवाय भविष्यासाठी उदयोन्मुख प्रतिभेची चाचणी घेण्याची आणि त्यांना वाढवण्याची उत्तम संधी देईल," असं शाहीद आफ्रिदीने एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांना यापुढे संघाच्या निवडीबाबत किंवा प्लेईंग इलेव्हनच्या अंतिम निर्णयात सहभागी करुन घेतलं जाणार नाही. पीसीबीच्या नवीन निवडकर्त्यांनी त्यांचे अधिकार कमी केले आहेत. पीसीबीमधील एका विश्वसनीय सूत्राने पीटीआयला सांगितले की, कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांच्या भूमिकेत बदल करण्यात आला असून या दोघांनाही संघ निवडीच्या किंवा प्लेइंग इलेव्हनच्या अंतिम निर्णयात सहभागी केलं जाणार नाही.
दुसऱ्या कसोटीसाठी (इंग्लंडविरुद्ध) प्लेइंग इलेव्हन शान आणि गिलिस्पी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर निश्चित करण्यात आलं आहे. पण यापुढे संघ निवडीबाबत त्यांच्याशी सल्लामसलत केला जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे.