लंडन : इंग्लंडच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार इओन मॉर्गनच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये तो खेळू शकणार नाही. त्यामुळे मॉर्गनऐवजी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीकडे 'जागतिक ११' या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तर मॉर्गनऐवजी इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्सला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर सॅम कुर्रेन, लेग स्पिनर आदिल राशिद, फास्ट बॉलर टायमल मिल्सलाही 'जागतिक ११' टीममध्ये निवडण्यात आलं आहे. कुर्रेन या मॅचमधून आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये आगमन करु शकतो. मॉर्गन मिडलसेक्सकडून समरसेटविरुद्ध खेळत असताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.
'जागतिक ११' या टीममध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा विकेट कीपर दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी हे दोघं आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळतील. शमीऐवजी सुरुवातीला हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली होती. पण हार्दिक पांड्याला ताप आल्यामुळे शमीची निवड करण्यात आली. ३१ मे रोजी 'जागतिक ११' टीमचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.
कॅरेबियन बेटांवरच्या एंग्लुईलामधलं जेम्स रोलॅण्ड पार्क आणि डोमिनिसियामधलं विंस्डर पार्क स्टेडियमच्या पुनर्निमाणासाठी ही मॅच खेळवण्यात येणार आहे. मॅचमधून मिळणारा निधी या स्टेडियमच्या पुनर्निमाणासाठी वापरण्यात येणार आहे. ही स्टेडियम इरमा आणि मारिया नावाच्या वादळांमुळे उद्धवस्त झाली होती.
शाहिद आफ्रिदी, तमीम इक्बाल, सॅम बिलिंग्स, दिनेश कार्तिक, राशिद खान, संदीप लामिचाने, मिचेल मॅकलेनघन, शोएब मलिक, तिसारा परेरा, ल्यूक रॉन्ची, आदिल रशीद, सॅम कुर्रेन, टायमल मिल्स, मोहम्मद शमी