मुंबई : सलामीवीर जोस बटलरच्या ९४ धावांच्या आक्रमक खेळींच्या जोरावर राजस्थानने रविवारी आयपीएलच्या ४७व्या सामन्यात मुंबईला सात विकेटनी हरवले. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात राजस्थानच्या बटलरने ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५३ चेंडूत ९४ धावांची तडाखेबंद खेळी केली. या विजयासोबतच राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा कायम आहेत.बटलरला त्याच्या धुंवाधार खेळीमुळे मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर रोहित म्हणाला, आम्हाला या पिचवर १५-२० धावा अधिक बनवायला हव्या होत्या. आधीच्या सामन्यात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आजच्याही सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली नाही. मात्र मी त्याबाबत अधिक निराश नाहीये. कारण आम्ही चांगले क्रिकेट खोळतोय. काही ठिकाणी आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. पुढच्या दोन सामन्यांत आम्हाला मनोबल कायम ठेवण्याची गरज आहे. आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नाही. मात्र हा आमच्यासाठी बहाणा नाही.
सामन्यानंतर बटलरने आपल्या दमदार खेळीचे रहस्य उलगडले. बटलर म्हणाला, मी फॉर्ममध्ये आलोय पुढेही हाच प्रयत्न करेन. आमच्यासाठी करो वा मरोची स्थिती आहे. मी अनेकदा मधल्या फळीत खेळलोय त्यामुळे शेवटपर्यंत फलंदाजी करत राहीन. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मला या मैदानावर खेळण्याची सवय आहे. त्यामुळे चांगली खेळी करण्यात यशस्वी ठरलो. पुढच्या सामन्यासाठी तयार आहे.