Shoaib Akhtar On Indian Captain: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय क्रिकेटसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम कॅप्टन कोण आहे याबद्दलचं मत अख्तरने व्यक्त केलं आहे. 'स्पोर्ट्सकीडा'शी संवाद साधताना अख्तरने त्याच्या मते भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे याबद्दल मतप्रदर्शन केलं आहे. शोएब अख्तरला थेट पर्याय देत प्रश्न विचारण्यात आला होता.
विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी आणि सौरव गांगुली या तिघांची नाव घेत यापैकी सर्वोत्तम कॅप्टन कोण वाटतो? असं शोएब अख्तरला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शोएबने धोनी आणि कोहलीपेक्षा सौरव गांगुली सर्वोत्तम कर्णधार असल्याचं म्हटलं आहे. अख्तरने दिलेलं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2000 साली भारतीय क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर सौरव गांगुलीने कर्णधारपद हाती घेतलं. भारतीय क्रिकेटची प्रतिमा सुधारण्याबरोबरच संघाला नवीन उमेद देण्याची जबाबदारी गांगुलीवर होती. गांगुलीच्या नेतृत्वाखालीच भारताने कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात विजय मिळवण्यास सुरुवात केली. गांगुलीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचला. गांगुलीने आपल्या नेतृत्वाने खरोखरच भारतीय संघाला नवीन उमेद दिली. गांगुलीच्या नेतृत्वाखालीच भारत 2022 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता ठरला. भारताने जेतेपद श्रीलंकेबरोबर वाटून घेतलं.
धोनीच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाने ऐतिहासिक कामिगिरी केली. भारताने टी-20 क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला. त्यानंतर भारताने 2011 मध्ये एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीच्या नेतृत्वाखालीच जिंकली. धोनी महान कर्णधारांपैकी एक आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला. तसेच भारताने 2021 ची कसोटी चॅम्पियनशीपची फायनल खेळली. खरं तर धोनी, कोहली आणि गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक पराक्रम केले. मात्र नशीबाने धोनीला अधिक साथ दिली. धोनी आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा कर्णधार ठरला.
चषकांचा विचार केला तर धोनी सरस ठरत असला तरी ऐन उमेदीच्या काळात संघाला आकार देणं आणि मार्ग दाखवण्याचं काम केल्याने शोएबला गांगुलीचं सर्वोत्तम वाटतो. तुमचं यावर काय मत आहे?