नवी दिल्ली: आशियाई स्पर्धेत हेप्टॅथ्लॉन प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्वप्ना बर्मनचा त्रास आता कमी होणार आहे. लवकरच तिला एक खास भेट मिळणार आहे. तिच्या दोन्ही पायांना मिळून 12 बोटे आहेत. त्यामुळे शूज घालून खेळताना स्वप्नाला त्रास व्हायचा. पदक जिंकल्यानंतर स्वप्नाने ही खंत बोलूनही दाखविली होती.
आपल्या पायासाठी वेगळ्या पद्धतीचे बूट डिझाईन केल्यास आणखी चांगली कामगिरी करु शकते, असा विश्वासही तिने व्यक्त केला होता.
यानंतर एक अमेरिकन कंपनी स्वप्नाच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने स्वप्नाच्या कामगिरीची दखल घेतली. त्यांनी अमेरिकेतील कंपनीला तिच्यासाठी शूज तयार कऱण्याचे कंत्राट दिले. त्यामुळे आगामी स्पर्धांमध्ये खेळताना स्वप्नाचा त्रास कमी होणार आहे.