Rishabh Pant: येत्या 22 तारखेपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून ऋषभ पंत खेळणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दरम्यान बीसीसीआयने (BCCI) ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) मोठी अपडेट दिली आहे. ऋषभ पंत आता पूर्णपणे फिट असून आयपीएलमध्ये तो खेळणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलंय. त्यामुळे 23 मार्चला होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात ऋषभ पंत खेळण्याची शक्यता आहे.
डिसेंबर 2022 मध्ये घरी जात असताना पंतचा मोठा अपघात झाला. त्यानंतर पंतने बंगळुरूमधील हॉस्पिटल आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये बराच वेळ घालवत स्वतःला संपूर्णपणे फीट केलं. दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू ऋषभ पंत म्हणालाय की, मी उत्साहित आहे, पण त्याचवेळी थोडासा नर्व्हस आहे. मी पुन्हा डेब्यू करणार आहे असं मला वाटतंय.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंत पुढे म्हणाला की, “मी जे काही अनुभवलं आहे ते पाहता पुन्हा क्रिकेट खेळू शकणं हे चमत्कारापेक्षा काही कमी नाहीये. मी माझ्या चाहत्यांचे आणि विशेषतः बीसीसीआय आणि एनसीएच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. त्यांचं प्रेम आणि पाठिंबा मला स्ट्रॉंग ठेवण्यास मदत करतं.
दिल्ली कॅपिटल्सच्या प्री-सीझन प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पंत म्हणाला, “मी दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएलमध्ये कमबॅक करण्यास उत्सुक आहे. ही एक अशी स्पर्धा आहे जी मला खेळायला खूप आवडतं. आमच्या टीम मालकांनी आणि सपोर्ट स्टाफने मला सुरुवातीपासून पूर्ण पाठिंबा दिला. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मी माझ्या कुटुंबासमोर आणि दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसमोर पुन्हा खेळण्यास उत्सुक आहे.”
बीसीसीआयने पंतला विकेटकीपर फलंदाज म्हणून फीट घोषित केले आहे. या दोन्ही भूमिका तो साकारण्याची शक्यता आहे. पंतने आतापर्यंत भारतासाठी 33 टेस्ट, 30 वनडे आणि 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शिवाय आयपीएलमध्ये फलंदाजी आणि विकेटकिपिंग अशी दुहेरी भूमिका पार पडणार असल्याचंही बीसीसीआयने म्हटलं आहे. आता 14 महिन्यांतर ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.