कोलकाता : परस्पर हितसंबंधाच्या मुद्द्यावरून राहुल द्रविडला मिळालेल्या नोटीसवर सौरव गांगुली बीसीसीआयवर भडकला आहे. याबाबतचं एक ट्विट सौरव गांगुलीने केलं आहे. 'भारतीय क्रिकेटमध्ये नवीन फॅशन आली आहे. परस्पर हितसंबंध... बातम्यांमध्ये राहण्याची सगळ्यात योग्य पद्धत. देवानेच भारतीय क्रिकेटची मदत करावी,' असं ट्विट गांगुलीने केलं.
New fashion in indian cricket .....conflict of interest ....Best way to remain in news ...god help indian cricket ......Dravid Gets Conflict of Interest Notice from BCCI Ethics Officer https://t.co/3cD6hc6vsv.
— Sourav Ganguly (@SGanguly99) August 6, 2019
सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही याआधी परस्पर हितसंबंधावरून बीसीसीआयच्या लोकपालनी नोटीस पाठवली होती. राहुल द्रविड याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)च्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. ही निवड होत असतानाच द्रविड इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्षही आहे. या कंपनीकडे आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग्सच्या टीमचे मालकी हक्कही आहे. हे परस्पर हितसंबंधाचं प्रकरण असल्याचा आरोप मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला. याबाबत संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांच्याकडे तक्रार केली.
याआधी संजीव गुप्ता यांनीच परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना नोटीस पाठवली होती. द्रविडबद्दल तक्रार आल्यानंतर बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी द्रविडला नोटीस पाठवली. १६ ऑगस्टपर्यंत द्रविडला या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे.