मुंबईकर खेळाडूला हीच शेवटची संधी, नाहीतर संपणार कसोटी कारकीर्द?

कोण आहे हा मुंबईचा खेळाडू? ज्याला मिळाली ही शेवटची संधी? दक्षिण आफ्रिका ठरणार त्याच्यासाठी महत्त्वाचा

Updated: Dec 9, 2021, 02:26 PM IST
मुंबईकर खेळाडूला हीच शेवटची संधी, नाहीतर संपणार कसोटी कारकीर्द?

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईच्या क्रिकेटपटूला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा खेळाडू अजिंक्य रहाणेकडून कसोटीतील उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणेकडून कसोटी फॉरमॅटमधील उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे.

गेल्या दोन वर्षात रहाणेचा फॉर्म खराब राहिला. त्यामुळे त्याची कारकीर्द आधीच धोक्यात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रहाणेला खराब फॉर्ममुळे संधी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण होत होता. आता निवड समितीनं रहाणेला आणखी एक संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जर रहाणे पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला नाही तर त्याचं करियर संपुष्टात येण्याचा धोका असल्याची चर्चा आहे. 

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नव्हती. तर न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने 63 बॉलमध्ये केवळ 35 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्याला केवळ 4 धावा करण्यात यश आलं आहे. अजिंक्य रहाणेच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियाला मोठा तोटा होत आहे. 

2013 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून अजिंक्य रहाणेने भारतासाठी 79 कसोटी सामने खेळले आहेत, परंतु त्याला अद्याप आमच्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळालेली नाही. 2016 मध्ये त्याला इंग्लंडविरुद्ध ही संधी मिळाली होती, पण बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो त्या मालिकेतून बाहेर पडला होता. 

 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये रहाणेने 21 डावांमध्ये 19.57 च्या सरासरीने फक्त 411 धावा केल्या आहेत, ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणेने कानपूर कसोटीत 35 आणि 4 धावा केल्या, त्यानंतर त्याची फलंदाजीची सरासरी 40 च्या खाली गेली. 

दुसरीकडे, पुजाराला दोन वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेलं नाही. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या दोघांवर धावा काढण्याची जबाबदारी होती, मात्र हे दोन्ही फलंदाज त्यात अपयशी ठरलेत. 

टीम इंडिया संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अरजन नागवासवाला.