Mahesh Babu on Ashes Test: अॅशेस टेस्टला सुरुवात अपेक्षेप्रमाणे धमाकेदार झाली असून इंग्लंडने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने अनोखी कामगिरी केली आहे. अॅशेस टेस्टमध्ये इंग्लंडने पहिल्याच दिवशी डाव घोषित केला. 393 धावांवर 8 गडी बाद असतानाच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने डाव जाहीर केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. यानंतर सोशल मीडियावर इंग्लंड संघाच्या आक्रमक फलंदाजीचं कौतुक होत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूदेखील (Mahesh Babu) आश्चर्यचकित झाला आहे. त्याने ट्वीट करत क्रिकेटचं हे नवं युग असल्याचं म्हटलं आहे.
इंग्लंडने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल होता. पण सामना सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे वर्चस्व मिळवलं होतं. इंग्लंडची स्थिती 176 धावांवर 5 गडी बाद अशी होती. सलग दोन विकेट्स गमावल्याने संघ संकटात होता. मात्र याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार जोए रुटने चांगली खेळी करत शतक ठोकलं. गेल्या आठ वर्षातील रुटचं अॅशेसमधील हे पहिलं शतक ठरलं. रुटने नाबाद 118 धावा ठोकल्या. दरम्यान संघ 393 धावांवर असतानाच स्टोक्सने डाव जाहीर केला. दिवस संपण्याआधी त्याने ऑस्ट्रेलियाला 20 मिनिटं खेळण्यासाठी दिली.
इंग्लंडने पहिल्याच दिवशी डाव घोषित करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने महेश बाबू फिदा झाला आहे. त्याने ट्वीट करत इंग्लंड संघाचं कौतुक केलं आहे. हे क्रिकेटचं नव युग असल्याचं त्याने म्हलं आहे. ट्वीटमध्ये त्याने म्हटलं आहे की, "393-8 d...मी हे योग्य वाचतोय का...Wow...Just Wow...क्रिकेटच्या नव्या युगाचा साक्षीदार ठरत आहे....Bazball".
393-8 d… Am I reading this right… Wow... Just wow… Witnessing a new era of Cricket… Bazball #ENGvsAUS #Ashes2023
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) June 16, 2023
कर्णधार बेन स्टोक्स यानेही सामना संपल्यानंतर डाव घोषित करण्याचा आपला निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. सामन्याची सुरुवातच या योजनेने झाली होती असं त्याने सांगितलं.
चार वर्षांपूर्वीच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची 10 डावात सरासरी 9.50 इतकी होती आणि इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने त्याला सात वेळा बाद केले. पण शुक्रवारी ब्रॉडने नवा चेंडू घेतल्यानंतरही, वॉर्नर 8 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, रूटला जॉनी बेअरस्टोची उत्कृष्ट साथ लाभली. त्याने सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना 78 धावा केल्या. त्याने एकूण 12 चौकार लगावले. रुटने आपल्या टेस्ट करिअरमधील 30 वं शतक ठोकलं. 2021 नंतरचं हे त्याचं 13 वं शतक आहे. रुटने आपल्या 118 धावांच्या खेळीत 4 षटकार आणि 7 चौकार लगावले.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 बळी घेतले. कॅमेरॉन ग्रीन आणि स्कॉट बोलँड यांनाही 1-1 विकेट मिळाली आणि जोश हेझलवूडला 2 बळी मिळाले.