४ वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात

देशामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच क्रिकेटपटू श्रीसंत यालाही क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

Updated: Aug 15, 2017, 09:48 PM IST
४ वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात title=

कोच्ची : देशामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच क्रिकेटपटू श्रीसंत यालाही क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उच्च न्यायालयानं उठवली आहे. त्यामुळे ४ वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात उतरला. एका सराव सामन्यामध्ये श्रीसंत सहभागी झाला होता. यावेळी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी श्रीसंतचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं.

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा पाऊल ठेवता आल्यामुळे मी खुष आहे. आता मी पुन्हा सुरुवात करणार आहे आणि मग भारताकडून खेळणार आहे, असा विश्वास श्रीसंतनं यावेळी व्यक्त केला. बीसीसीआयनं बंदी घातल्यामुळे श्रीसंतला मैदानातही जायची परवानगी नव्हती. तसंच टीमच्या प्रशिक्षणामध्येही श्रीसंतला भाग घेता येत नव्हता.

श्रीसंतला सात ऑगस्टला केरळ उच्च न्यायालयानं दिलासा दिला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं श्रीसंतवर घातलेली आजीवन बंदी उच्च न्यायालयानं उठवली होती.

आयपीएलच्या सहाव्या सिझनवेळी २०१३ स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून श्रीसंतवर बीसीसीआयनं बंदी घातली होती. १६ मे २०१३ साली श्रीसंतबरोबरच राजस्थान रॉयल्सच्या अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये या खेळाडूंसोबतच आणखी ३९ जणांना आरोपी बनवण्यात आलं. या सगळ्यांनी फक्त सट्टेबाजी नाही तर स्पॉट फिक्सिंगही केल्याचा दावा दिल्लीचे माजी पोलीस कमिशनर नीरज कुमार यांनी केला होता. यानंतर १० जून २०१३ला श्रीसंत, चंडीला आणि चव्हाणला जामीन देण्यात आला.

२५ जून २०१५साली पटियाला हाऊस कोर्टानं ठोस पुरावे नसल्यामुळे या तिघांचीही मुक्तता केली. तरीही बीसीसीआयनं श्रीसंतवरची बंदी कायम ठेवली. यानंतर श्रीसंतनं उच्च न्यायालयात धाव घेतली.